इंस्टाग्रामवरील कमेंटवरून तरुणींचा तुफान राडा; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:57 PM2022-04-01T18:57:49+5:302022-04-01T19:00:31+5:30
यासंदर्भात भाईंदर पोलीस ठाण्यात ३० मार्च रोजी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मीरारोड - इंस्टाग्रामवर एका तरुणीच्या फोटोवर तरुणीनेच अपशब्द वापरत कमेंट केलेल्याने, तरुणींच्या दोन गटांत तुफान राडा झाला. यासंदर्भात भाईंदर पोलीस ठाण्यात ३० मार्च रोजी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाईंदर पश्चिमच्या विनायक नगरमधील न्यू बलदेवमध्ये राहणाऱ्या स्नेहा सरोज शाव हिच्या फिर्यादी नुसार, तिने इन्स्ट्राग्राम अकाउंटवर स्वतःची फोटो स्टोरी केली होती. त्या फोटोला तिची वर्ग मैत्रीण भुमी गुप्ता (अंबिका पार्क, शिवसेना गल्ली) हिने अपशब्द वापरत कमेंट केली. स्नेहाने हा प्रकार भूमीच्या आई - वडिलांना सांगितला असता भूमीला राग येऊन तिने स्नेहाच्या मानेवर चावा घेतला आणि तिला मारहाण करून शिवीगाळ केली.
यानंतर भूमीने पुन्हा स्नेहाविरुद्ध पोस्ट टाकली. भूमी स्नेहाचा मोबाईल नंबर मित्रांकडे मागत असल्याने स्नेहा, तिची बहीण खुशबू शाव व मैत्रीण किरण कुमान, हे भूमी काम करत असलेल्या शिवसेना गल्लीतील डॉ, आशिष परमार यांच्या दवाखान्यात गेले. तेथून त्या सर्व रिक्षाने पोलीस ठाण्याजवळ आणि नंतर १६ मजली टॉवरकडे पायी चालत गेल्या व तेथून स्नेहाच्या घराकडे गेल्या. उशीर झाल्याने भूमीच्या भाऊ प्रिन्स ह्याला राग आला त्याने स्नेहाचा भाऊ शुभम याला मारहाण केली, म्हणून भूमी व प्रिन्स विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तर भूमी हिच्या फिर्यादी नुसार, ती दवाखान्यात कामावर असताना स्नेहा तिच्या ३ - ४ मत्रिणींसोबत आली व इंस्टा वरील फोटोला शिवी देऊन रिप्लाय का केला? असा जाब विचारत स्नेहा आणि तिच्या मत्रिणींनी तिला धक्का देवून खाली पाडत शिवीगाळी केली. डॉ. परमार यांनी इकडे भांडण करू नका सांगितल्यावर त्या सर्वजणी शिवीगाळ करत निघून गेल्या . दुसऱ्या दिवशी स्नेहा व मैत्रिणींनी भूमीला घराबाहेर बोलावून मारहाण केली. भूमीच्या आई - वडिलांनासुद्धा शिवीगाळ आणि मारहाण केली.
२९ मार्च रोजी भूमीला ती कामावर असताना दवाखान्यातून खेचून नेले व नंतर रिक्षात बसवून मारहाण सुरू केली. १६ मजली टॉवर जवळ भूमीला रिक्षातून खाली ढकलून मारहाण सुरु केली. भूमीचे आई - वडील पोलीस घेऊन स्नेहाच्या घरी गेल्याचे समजल्याने तिला धमकी देत सोडून दिले, अशा भूमीच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी स्नेहा, खुशबू, दिशा व इतर ३ - ४ मुलींवर गुन्हा दाखल केला आहे. बहुतांश मुली ह्या अल्पवयीन असल्याने सदर घरणेने खळबळ उडाली आहे.