प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यूच्या तपास NIA करत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज दक्षिण मुंबईतील एका हॉटेलावर छापा टाकला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
गिरगाव परिसरातील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या बैठकीसंदर्भात विशिष्ट सूचना मिळाल्यानंतर एनआयएचे पोलीस अधीक्षक स्तरीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. NIA ने रेस्टॉरंटच्या स्टाफ आणि मालकांची चौकशी केली. अटक निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे हे या रेस्टॉरंटला अनेकदा भेट देत अशी माहिती NIA ला मिळाली होती. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले की, हॉटेलला येताना वाझे एकटेच असायचा की, वाझेंबरोबर अन्य कोणी येत होतं का? आणि अन्य बाबींची चौकशी करण्यात आली. जेणेकरून या दोन्ही गुन्ह्यांची उकल होईल. काहीतरी मोठी माहिती उघड करण्याचा NIA प्रयत्न करत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या इमारतीजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओसह आतापर्यंत ७ वाहने जप्त केल्यानंतर एनआयए आता आणखी एका लक्झरी वाहनाच्या मागावर आहे. जिलेटीनच्या कांड्यांबरोबर मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उद्देशून लिहिलेली धमकीची चिठ्ठी स्कॉर्पिओ गाडीत ठेवणे राहून गेल्याने मुख्य आरोपी सचिन वाझे २५ फेब्रुवारीला पहाटे पुन्हा घटनास्थळी आले, अशी माहिती मिळाली असून त्याबाबत खातरजमा सुरू असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) अधिकाऱ्याने सांगितले आहे.अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला कारमायकल मार्गावर बेवारस स्कॉर्पिओ आढळली. त्यात सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या सुट्या कांड्या आणि ‘मुंबई इंडियन्स’चा शिक्का असलेल्या बॅगमध्ये खोवलेली चिठ्ठी आढळली होती. एटीएस आणि एनआयए या दोन्ही यंत्रणांनी संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम जुळवणारे, आरोपींचा सहभाग स्पष्ट करणारे सीसीटीव्ही चित्रण गोळा केले आहे. या चित्रणावरून स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाड्या मध्यरात्री कारमायकल मार्गावर थांबल्या. स्कॉर्पिओ गाडी तेथेच सोडून चालक इनोव्हा गाडीत बसून निघून गेला. काही तासांनी संशयित आरोपी पुन्हा तेथे आले. स्कॉर्पिओ गाडी न्याहाळली आणि माघारी फिरले, असे या चित्रणावरून आढळले आहे. या वाहनांचा मुंबई, ठाण्यातील प्रवास स्पष्ट करणारे चित्रणही यंत्रणांनी मिळवले आहे.