मुंबई - अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना फोनवरून ठार मारण्याची धमकी आल्याचा प्रकार घडला आहे. मैं छोटा शकील का आदमी हू! सलमान का नंबर देना! नही तो जान से मार दूंगा अशी सलीम यांना धमकी प्राप्त झाली. या प्रकरणी पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गुंड शाहरुख गुलाबनबी उर्फ शेरा याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. मी छोटा शकीलचा माणूस आहे सलमान खानचा नंबर द्या नाहीतर ठार करेन अशी धमकी शाहरुख उर्फ शेराने दिली होती. त्याला अटक करण्यात आली असून कोर्टात हजर करण्यात आले. २२ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उत्तर प्रदेशात शेरा या गुंडावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, प्राणघातक हत्यारं वापरणं असे साठहून अधिक गुन्हे दाखल आहे. त्याचा टायर विक्रीचा व्यवसाय आहे. शेरा या गुंडाने सलीम खान यांना दहापेक्षा जास्त वेळा फोन केल्याचे निदर्शनास आले.
याआधी ६ ऑक्टोबर रोजी सलीम खान यांनी त्यांचा मॅनेजर विकास हेमेंद्रकुमार छाया यांना अशाच प्रकारे धमकीचा फोन आला होता. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन तक्रार केली. नंतर १३ नोव्हेंबरला देखील सलीम खान यांना असा धमकीचा फोन प्राप्त झाला. याबाबत देखील तक्रार वांद्रे पोलीस ठाण्यात देण्यात आली. मोबाईल नंबरवरून माहिती काढल्यानंतर शेरा नावाच्या माणसाचा हा मोबाइल असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मोबाइल क्रमांकाचा माग काढून शेरा उर्फ शाहरुख नबीला अटक केली. वांद्रे पोलीस ठाण्यात शेराविरोधात भा. दं. वि. कलम ५६०, १७०, ६६ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.