लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एजी पेरारीवलन उर्फ अरीवू याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या मुदतपूर्व सुटकेविषयी माहिती मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
अरीवू आणि संजय दत्त या दोघांनाही आर्म्स अॅक्टअंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, संजय दत्त शिक्षा संपवून कारागृहाबाहेर आल्याने त्याची मुदतपूर्व सुटका कशाच्या आधारे केली, याची माहिती अरीवू याने मगितली. माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागूनही ती न देण्यात आल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.
राजीव गांधी यांच्या हत्येसाठी वापरलेल्या बॉम्बकरिता दोन नऊ व्होल्टच्या बॅटरी जोडल्या होत्या. त्या अरीवू यांनी पुरविल्याचा आरोप ठेवून वयाच्या १९ व्या वर्षी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांनतर असे सिद्ध झाले की, अरीवू याला बॅटरी कशासाठी वापरण्यात येणार होती, याची कल्पना नव्हती.
संजय दत्तची दया याचिक राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर आणि त्याला ठोठावलेली शिक्षा केंद्राच्या अखत्यारितील कायद्यांतर्गत असूनही महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून संजय दत्तच्या शिक्षेची मुदत संपण्याआधी सुटका केली. महाराष्ट्र सरकारने कोणती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संजय दत्तची लवकर सुटका केली, याची माहिती मिळविण्यासाठी अरीवूने मार्च २०१६ मध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून माहिती मगितली. मात्र येरवडा कारागृहाचा माहिती देणारा अधिकारी आणि पुणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली नाही. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व संजय दत्तच्या मुदतपूर्व सुटकेची माहिती द्यावी, अशी विनंती अरीवू याने याचिकेद्वारे केली.