लाखोंचे आमिष दाखवून सरोगसी, लोकमतने केला रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 02:43 AM2018-07-30T02:43:51+5:302018-07-30T02:44:10+5:30
गोरगरीब महिलांना लाखोंची रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांना सरोगसी मदर बनविणाऱ्या आणि नंतर त्यांना रक्कम देण्याऐवजी धमक्या देणा-या रॅकेटचा ‘लोकमत’ने पर्दाफाश करताच सर्वत्र खळबळ उडाली.
- नरेश डोंगरे
नागपूर : गोरगरीब महिलांना लाखोंची रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांना सरोगसी मदर बनविणाऱ्या आणि नंतर त्यांना रक्कम देण्याऐवजी धमक्या देणा-या रॅकेटचा ‘लोकमत’ने पर्दाफाश करताच सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणी एका सरोगसी मदरच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. वर्षा ढवळे आणि डॉ. दर्शना पवार तसेच दलालाची भूमिका वठविणाºया मनीष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मनीष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा मुंधडा या दोघांना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली.
आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या ज्या दाम्पत्यांना मूलबाळ होत नाही, अशा दाम्पत्यसोबत संपर्क करून त्यांना अपत्यसुखाचे आमिष दाखवायचे, त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे आणि त्यांच्यासाठी गोरगरीब महिलांना सापळ्यात अडकवायचे, असा या रॅकेटचा गोरखधंदा आहे. या रॅकेटने अनेक गरीब महिलांना सरोगसी मदर होण्यासाठी लाखोंचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले आहे. कुण्या महिलेला अडीच कुणाला तीन तर कुणाला चार ते पाच लाखांचे आमिष दाखवून सरोगसी मदर होण्यास तयार केले. मात्र एकदा प्रसुती झाली आणि बाळ हातात आले की नंतर त्या महिलेला वाºयावर सोडण्यात येत होते.
‘लोकमत’ने या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस तपासाची चक्रे फिरली. सायंकाळी या प्रकरणी डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. वर्षा ढवळे आणि डॉ. दर्शना पवार तसेच मुंधडा दाम्पत्याविरुद्ध नंदनवन ठाण्यात भादंविचे कलम ४२० (फसवणूक), ५०६ (धमकी देणे) आणि ३४ (गुन्ह्यात संगणमत) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींना शोधण्यास विविध पोलीस पथके वेगवेगळ्या भागात रवाना केली. स्वत: ते आरोपीच्या शोधासाठी प्रयत्नरत होते. या पार्श्वभूमीवर आरोपी मनीष आणि त्याची पत्नी हर्षा मुंधडाला पोलीस पथकाने नाट्यमयरीत्या अटक केली.
कसून चौकशी सुरू : भरणे
पीडित (सरोगसी मदर) महिलांची संख्या वाढत चालल्याने पोलीसही गंभीरपणे चौकशी करीत आहेत. पीडित महिलांना दिलासा देणे, त्यांना आश्वस्त करणे, हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. सोबतच आरोपींना बचावासाठी कुठलीही कायदेशीर पळवाट मिळू नये, असा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलू आणि आरोपींची आम्ही कसून चौकशी करीत आहोत, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी दिली.
१० महिलांच्या तक्रारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपर्यंत त्यांच्याकडे एकूण दहा महिलांनी तक्रारी नोंदवल्या. मात्र, या प्रकरणात किती महिलांच्या तक्रारीवर किती गुन्हे दाखल झाले आणि त्यात एकूण किती आरोपी आहेत, ते स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी मनीष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा यांना रविवारी पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांचा १ आॅगस्टपर्यंत पीसीआर मिळवला.