औरंगाबाद - गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तहसील कार्यालयाने अधिग्रहित केलेल्या विहिरीचा मोबदला देण्याच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना रहाळपट्टी तांडा ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचालालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत रंगेहाथ पकडले.
ही कारवाई रहाळपट्टी तांडा फाट्यावरील हॉटेलमध्ये करण्यात आली. पूनमचंद रूपा चव्हाण (३८,रा. राहळपट्टी तांडा, गावदरी तांडा,ता. औरंगाबाद) असे आरोपी सरपंचाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांनी सांगितले की, तक्रारदार शेतकरी यांच्या शेतातील विहिर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी तहसील कार्यालयाने अधिग्रहित केली होती. या विहिरीसाठी शासन त्यांना प्रतिदिन सहाशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे धनादेशाद्वारे शासनाकडून मोबदला दिला जातो.ही रक्कम मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून लागणाऱ्या प्रमाणपत्रावर सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक असते. प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी तक्रारदार हे सरपंच पूनमचंद चव्हाण यांना भेटले तेव्हा त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पहिला हप्ता म्हणून पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारप्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. आणि आज १८ ऑक्टोबर रोजी रहाळपट्टी तांडा फाट्यावरील एका हॉटेलमध्ये आरोपी सरपंचाला पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी तक्रारदार शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये लाच घेतल्यांनतर सरपंच पूनमचंद चव्हाण यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बी.व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप राजपूत, कर्मचारी रविंद्र देशमुख, रविंद्र आंबेकर, बाळासाहेब राठोड आणि चालक बागुल यांनी केली. आरोपी चव्हाणविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.