पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याप्रकरणात संशयित संतोष जाधव याचा साथीदार महाकाल ऊर्फ सौरभ ऊर्फ सिद्धेश हिरामण कांबळे (वय १९, रा. नारायणगाव) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मंचर येथील ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले खून व मोक्का प्रकरणात अटक करण्यात आली असून न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
सिद्धू मुसेवाला याच्या हत्याप्रकरणात सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन शॉर्प शूटर संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांची छायाचित्रे प्रसिद्धीला दिल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, महाकाल कांबळे हा सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य संशयित संतोष जाधव याच्या संपर्कात होता. संतोष जाधव याच्याबरोबर महाकाल याने मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या राज्यात प्रवास केला होता, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. राण्या बाणखेले याच्या खूनातील फरारी संतोष जाधव याला आश्रय दिल्याने महाकाल याला या खूनात अटक केली आहे. त्याचा सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात सहभाग आहे का याचा तपास पोलीस कोठडीदरम्यान करण्यात येणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
संतोष जाधव याचे नाव मुसेवाला हत्याप्रकरणात समोर आल्यानंतर त्याचा शोध सुरु असताना महाकालची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक अशोक शेळके व त्यांच्या पथकाने त्याला पुणे नगर जिल्ह्याच्या सीमेवर संगमनेरजवळ मंगळवारी पकडले. त्याला बुधवारी मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील अधिक तपास करीत आहेत.
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच, स्पेशल सेलने दिली माहिती
महाकाल हा मुळचा नारायणगावचा असून त्याचे वडिल आळेफाटा येथे चालक म्हणून काम करतात. त्याला दोन बहिणी असून त्यातील एक बहीण संगमनेरमध्ये असून एक शिक्रापूर येथे रहात असल्याचे समजते. महाकाल हा संतोष जाधव याच्याबरोबर असला तरी त्याच्याविषयी फारशी माहिती नाही. त्याचे पोलीस रेकॉर्डही नाही.