निखिल म्हात्रे
अलिबाग - वडिल रागावले म्हणून घरातून निघून गेलेल्या 16 वर्षीय मुलीला अलिबागपोलिसानी एका तासात शोधून काढले आहे. या मुलीला सुखरुप तिच्या आईच्या ताब्यात दिले आहे. हि मुलगी गुंजीस फाटा येळ्याजवळ मिळाली. महिला पोलिस सोनम कांबळे हिने मुलीची समजूत काढत तिचे मत परीवर्तन करून तिला तिच्य़ा घरच्यांची भेट घालून आणली. अलिबाग पाेलिस ठाण्यातील दामिनी पथकाच्या कामगीरीचे काैतुक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
बुधवारी दुपारी साडेबारा बाजण्याच्या सुमारास अस्मिता अशोक मोकल (रा- कनकेश्वर फाटा) या अलिबाग पोलिस ठाण्यात आल्या होत्या. आपली 16 वर्षीय मुलगी सकाळ पासून घरी नसल्याची फिर्याद दिली होती. ठाणे अंमलदार पोलिस नाईक रुपेश निगडे यांनी अस्मिता मोकल यांच्याकडून सविस्तर माहिती विचारून घेत अलिबाग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के.डी. कोल्हे यांना कळविले.
परीस्थिती लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक के.डी. कोल्हे यांनी तात्काळ चालक अंमलदार उदय सावंत, दामिनी पथकातील महिला अंमलदार सोनम कांबळे व पोलिस अधिकारी राकेश काळे असे पथक मुलीचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते.हे पथक अलिबाग हद्दीत शोध घेत असताना तक्रारदार महिलेने सांगितलेल्या वर्णनाची मुलगी गुंजीस फाटा येथील तळ्याजवळ उभी असल्याचे दिसून आली.
या मुलीला अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे महिला पोलीस कर्मचारी कांबळे यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. वडील रागावल्याने सकाळपासून घरातून निघून आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. नेमलेल्या पथकाने मुलीचे मन परिवर्तन करुन तिला तिची आई व मामा यांच्या ताब्यात सुखरुप परत केले. अलिबाग पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे अस्मिता मोकल यांना त्यांची मुलगी सुखरुप परत मिळाली. याबद्दल त्यांनी अलिबाग पोलिसांचे आभार मानले आहेत.