मुंबई : विवाहानिमित्त घरमालक परदेशात गेल्याचा फायदा घेत नोकराने त्याच्या घरी ६२ लाखांचा डल्ला मारत पळ काढला. या प्रकरणी कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नसतानादेखील त्याला साथीदारासह अटक करण्यात अंबोली पोलिसांना मंगळवारी यश मिळाले. मुख्य म्हणजे चोरीला गेलेली सगळी मालमत्तादेखील त्यांनी हस्तगत केली. संजीव राय असे अटक आरोपीचे नाव आहे.
राय हा सुखविंदरसिंग दुग्गल यांच्याकडे घरकाम करीत होता. गेल्या आठवड्यात लग्न समारंभासाठी दुग्गल हे कुटुंबीयांसोबत बँकॉकला गेले होते. त्याचा फायदा घेत रायने त्याच्या अन्य साथीदारासोबत
दुग्गल यांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे, परफ्युम, दोन लॅपटॉप असा ६२ लाख ०४ हजार ६४९ रुपयांचा ऐवज चोरला आणि पसार झाला. त्याने स्वत:चा मोबाइलदेखील बंद केला. दुग्गल परतल्यावर त्यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार अंबोली पोलीस रायचा शोध घेत होते.
अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चंदिगढ आणि बिहारमध्ये तपासासाठी खास दोन पथके तयार करून पाठविण्यात आली. संजीव आणि त्याचा मित्र अनिल राय याच्या शोधार्थ चंदिगढ, कुराली आणि मोहाली परिसरात त्यांनी सतत तीन दिवस पाळत ठेवत अखेर दोघांना बेड्या ठोकल्या. तसेच त्यांनी चोरून नेलेला सर्व ऐवजही साहाय्यक पोलीस निरीक्षक कळमकर यांच्या पथकाने हस्तगत केला. त्यामुळे या पथकाचे परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान कौतुक केले. या संशयित आरोपींना न्यायालयाने २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे गायकवाड यांनी सांगितले.