मुंबई : रेल्वेत खलाशी म्हणून नोकरी करणाऱ्या जॉयनस अॅडम येल्लामती या ४२ वर्षांच्या इसमास त्याने न केलेल्या चोरीच्या गुन्ह्याची कबुली घेण्यासाठी कोठडीत कोंडून बेदम मारहाण केल्याच्या २५ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील आठ माजी पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी प्रत्येकी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.या सर्वांना सत्र न्यायालयाने भादंवि कलम ३३० अन्वये तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. उच्च न्यायालयानेही ती कायम केली होती. ही शिक्षा वाढवावी यासाठी राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून हा निकाल दिला. जॉयनस याचा कोठडीत मारहाण करून खून करणे (कलम ३०२), त्याच्या पत्नीचा विनयभंग करणे (कलम ३५४) व त्याच्या पत्नीसह इतर कुटुंबियांना डांबून ठेवणे (कलम ३४२) या गुन्ह्यांतून या सर्वांना निर्दोष ठरविण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला गेला.सात वर्षांचा सश्रम कारावास झाला त्यांची नावे अशी: सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत कराडे (सध्याचे वय ६३ वर्षे), उपनिरीक्षक रामभाऊ कडू (६४) आणि झहिरुद्दीन देशमुख (६६), नीलकंठ चोरपगार (६१), नामदेव गणेशकर (६४), रमेश भोयर (५४), अशोक शुक्ला (५०) व सुधाकर ठाकरे (४९).गुन्हा करताना हे सर्वजण नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेत नियुक्तीवर होते. खटला दाखल झाल्यावर त्यांना प्रथम निलंबित व शिक्षा झाल्यावर बडतर्फ केले गेले. आठपैकी पाच आरोपींची निवृत्तीची वयेही उलटून गेली आहेत. तीन वर्षांचा कारावास भोगून हे सर्व सुटले होते. आता त्यांना वाढीव शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात जावे लागेल.काय होते प्रकरण?इंडिया सन हॉटेलमध्ये राहात असताना आपल्या चीजवस्तू लुटण्यात आल्या, अशी माहिती गणेशप्रसाद, अरुणकुमार व काशिरामनी देवलापूर ठाण्याचे पोलीस जमादार माधवराव तेलगुडिया यांना २३ जून १९९३ रोजी दिली. तेलगुडिया तिघांना घेऊन पोलीस निरीक्षक नरुलेंकडे आले. त्या रात्री गस्त घालताना संशयिताचा शोध घेण्याचे ठरले. सुरुवातीस ही चोरी अँथनी नावाच्या व्यक्तीने केल्याचा कयास होता. गस्ती पथक मध्यरात्रीनंतर येल्लामती यांच्या घरी पोहोचले. येल्लामती गाढ झोपले होते. पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर खेचले व मारहाण केली. नंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून नग्न करून बेदम मारहाण केली. दुसºया दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
नागपूरच्या आठ बडतर्फ पोलिसांना सात वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 12:24 AM