शाब्बास मुंबई पोलीस...पुण्यात चोरलेले बाळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा आले आईच्या कुशीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 08:16 PM2018-08-23T20:16:27+5:302018-08-23T20:25:54+5:30
आईच्या कुशीत बाळ विसावेपर्यंत त्याला आंघोळ घालणं, दूध पाजणं या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी ओशिवरा पोलिसांनी सांभाळल्या. मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे आज आंबोली आणि ओशिवरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
मुंबई - पुणे रेल्वे स्थानकातून पळवलेल्या ४ महिन्यांच्या बाळाची सुटका करून ते पुन्हा त्याच्या आईकडे सोपवण्याची कौतुकास्पद कामगिरी मुंबईपोलिसांनी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी हे बाळ आईची नजर चुकवून भिकारी महिलेने चोरले होते. या बाळाला हातात घेऊन ही महिला भीक मागत होती. महिला आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या बाळाला पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावता आलं आहे. मनिषा महेश काळे (वय - २५) असे या बाळ चोरणाऱ्या महिलेचे नाव आहे.
बकरी ईदच्या निमित्ताने मुंबईत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि अनेक ठिकाणी पोलीस गस्त देखील घालत होते. एका महिलेने सकाळी ११ च्या सुमारास भिकारी महिलेच्या हातातील बाळ हे तिचे वाटत नसल्याचा संशय आंबोली पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडे व्यक्त केला. ही माहिती मिळताच मोबाईल व्हॅनमधील पोलीस पथकाने तात्काळ बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल येथे धाव घेतली आणि संशयित महिलेला ताब्यात घेतले. या महिलेची चौकशी केली असता तिने हे बाळ चोरल्याचे कबूल केले.
ही घटना ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हे बाळ ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ओशिवरा पोलिसांनी देखील लागलीच पुणे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. बाळचोरीला गेल्याचा गुन्हा त्यांच्याकडे नोंदवण्यात आल्याने बाळाच्या आईचा शोध घेणं सोपं झालं. या बाळाच्या आईला फोन करून तिचं बाळ सुखरूप असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आईच्या कुशीत बाळ विसावेपर्यंत त्याला आंघोळ घालणं, दूध पाजणं या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी ओशिवरा पोलिसांनी सांभाळल्या. मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे आज आंबोली आणि ओशिवरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.