मैत्रिणीच्या चिमुकल्याचा लळा, तीने बाळालाच पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 07:27 PM2019-12-19T19:27:59+5:302019-12-19T19:37:08+5:30
मुंबईतील भाईंदर भागातून महिलेने चिमुकल्याला घेवून पळ काढला.
किनवट (जि. नांदेड): कंपनीत काम करीत असतांना महिले सोबत झालेली ओळख मैत्रीत बदलली यातून तिच्या पाच वर्षाच्या चिमुकल्या बाळाचा लळा लागला आणि एकेदिवशी मुंबईतील भार्इंदर भागातून तिने त्या चिमुकल्याला घेवून पळ काढला. गुरुवारी या महिलेला किनवट पोलिसांनी तालुक्यातील बोधडी येथून बाळासह ताब्यात घेवून ठाणेपोलिसांच्या स्वाधीन केले.
मुळगाव बोधडी येथील संगीता हिचा उमरखेड तालुक्यातील खरबी येथील तरुणाशी विवाह झाला होता. २००८ मध्ये तिला मुलगीही झाली. मात्र अवघ्या चार महिन्यातच या मुलीचा मृत्यु झाला. त्यानंतर २००९ मध्ये पती गजानन यांचेही निधन झाले. त्यामुळे उघड्यावर पडलेल्या संगीताने २०१४ मध्ये बहिणीच्या मुलाकडे पुण्याला जावून कंपनीत कामाला लागली़ त्यानंतर २०१६ मध्ये मुंबई येथील एका कंपनीत तिने काम सुरु केले़ याच कंपनीत काम करणाऱ्या सुनिल भारव्दाज यांच्या सोबत तिचे लग्न झाले. कंपनीत काम करणाऱ्या कुसूम रोहित यादव या महिलेसोबत तिची कालांतराने ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मैत्रीन कुसूम ही आपल्या पाच महिन्याच्या अभय या बाळाला संगीताकडे सोपवून कामाला जात असे, बाळ संगीताकडे अनेकवेळा राहात असल्याने संगीतालाही या बाळाचा लळा लागला.
एकेदिवशी संधी साधून संगीताने बाळासह मुंबईतील भार्इंदर भागातून पलायन केले. मैत्रीनीसह बाळही गायब असल्याने कुसुम यादव यांना धक्काच बसला त्यांनी नवघर पोलिस ठाणे गाठून बाळाला पळवून नेल्याची तक्रार दिली. यावरून संगीता सुनील भारव्दाज यांच्या विरुध्द कलम ३६३,३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान संगीताही मुंबईतून नंदीग्राम एक्सप्रेसने बाळाला घेवून किनवट तालूक्यातील बोधडी येथे आली. ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला असता टॉवर लोकेशन वरुन आरोपी संगीता हिचे लोके शन मदनापूर, शनिवार पेठ असे आढळून आले. या लोकेशनवरुन तपास करीत पोलीस किनवट तालूक्यातील बोधडी येथे पोहचले. येथे संगीताची बहिण रुख्माबाई खुपसे यांच्या घरात संगीता बाळासह आढळली. किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल गडपवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता गजलवाड तसेच होमगार्ड बांधवांनी ही कार्यवाही केली. सदर चिमुकल्याला संगीतासह ठाणे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
म्हणे अपहरण नव्हे, बहिणीकडे घेवून आले
तुझाच मुलगा आहे असे सांगत अभय या बाळाला त्याची आई कुसुम ही माझ्या ताब्यात देवून कामावर जायची. बाळ जास्तवेळ माझ्याकडेच राहायचे त्यामुळे मलाही त्याचा लळा लागला होता. दरम्यान बहिणीकडे जायचे म्हणून मी बाळाला सोबत घेवून आले मी बाळाचे अपहरण केले नाही असा दावा आरोपी संगीता ही पोलीसांकडे करीत होती. किनवट पोलिसांनी सुमारे दोन अडीच तास चौकशी केली. यावेळी पाच वर्षाचा चिमुकला अभय संगीता यांच्या कुशीतच होता.