शेणवा - सोगाव अंगणवाडीतील 13 मुलांना.आयर्न फोलिक अॅसिड टॉनिकचा डोस पाजल्याने उलट्या जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली आहे. यातील 6 मुलांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून काही मुलांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी सांगितले.तालुक्यातील सोगाव येथील अंगणवाडीतील शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील 13 मुलांना आयर्न फोलिक असिड टॉनिकचा डोस पाजल्याने उलटी व मळमळ होण्यास सुरुवात झाली. या मुलांना टाकीपठार आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, त्यांनतर घरी पुन्हा या मुलांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने या मुलांना प्राथमिक उपचार म्हणून किन्हवली रूग्णालयात व शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. प्राथमिक अंदाजानुसार औषधाचा जादा डोस दिल्याने ही परिस्थिती उदभवली असली तरी शिल्लक असलेला औषधांचा साठाही तपासणी करण्यात येणार असून ह्याबाबात चौकशी करून तसा अहवाल वरीष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी सांगून सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.