तळेगाव दिघे - प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने विषारी औषध घेत आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवाशी असलेला अमित अशोक मिंडे हा युवक राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) याठिकाणी एका खाजगी रुग्णालयात एमआरआय टेक्निशियन या पदावर नोकरी करीत होता. याच रुग्णालयात बीएचएमएसचे शिक्षण असलेली एक डॉक्टर तरुणी नोकरी करीत होती. एकाच रुग्णालयात नोकरीस असल्याने दोघांचे प्रेमसबंध जुळले होते. दरम्यान मंगळवारी (दि. ५) डॉक्टर तरुणी तिच्या घरी आली होती. तिच्या समवेत अमित मिंडे हा देखील आला होता. मात्र तरुणीने अमितला लग्नास नकार दिला. प्रेमभंग झालेल्या अमित मिंडे याने मोबाईलवरुन कुटुंबियांशी संपर्क साधत घडला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर कौठेकमळेश्वर शिवारात अमितने डाळींब बागेत विषारी औषध सेवन करून आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास काही महिला सरपण काढण्याच्या निमित्ताने गेल्या असता त्यांना मृतदेह आढळून आला. डाळींब बागेनजीक दुचाकी आढळून आली. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक अश्विनी टिळे, लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. आत्महत्येपूर्वी अमित मिंडे याने फोनकरून कुटुंबियांना या सर्व प्रकाराची माहिती दिली होती, असे पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी सांगितले. याप्रकरणी मयताचा भाऊ सुधीर अशोक मिंडे याने पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.
धक्कादायक! प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 7:33 PM
याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देसंगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवाशी असलेला अमित अशोक मिंडे हा युवक राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) याठिकाणी एका खाजगी रुग्णालयात एमआरआय टेक्निशियन या पदावर नोकरी करीत होता.बुधवारी सायंकाळच्या सुमारास काही महिला सरपण काढण्याच्या निमित्ताने गेल्या असता त्यांना मृतदेह आढळून आला.