धक्कादायक! मुलीसह बँकेकडून कँन्सरग्रस्त आईची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:12 PM2019-03-28T12:12:28+5:302019-03-28T12:26:51+5:30
लॉकरच्या बनावट चाव्या तयार करुन तसेच कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करीत बँक अकाउंट मधून पैसे काढून एका कँन्सरग्रस्त आईची मुलीसह बँकेने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
पुणे : लॉकरच्या बनावट चाव्या तयार करुन तसेच कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करीत बँक अकाउंट मधून पैसे काढून एका कँन्सरग्रस्त आईची मुलीसह बँकेने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि युक्तिवादाच्या आधारावर न्यायालयानेपोलिसांना तपशीलवार तपास करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग कनिष्ठ न्यायालयाने दिले आहेत.
जेनोबिया रुसी पटेल (वय ८५, रा,कन्टोमेंट) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची माहिती अँड. आशुतोष श्रीवास्तव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, जेनोबोया यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता. त्यांनी हडपसर भागात मालमत्ता खरेदी केली होती. मात्र आजारपणामुळे त्यांनी त्या जागेची विक्री केली. मिळालेली रक्कम त्यांनी पती रुसी पटेल हयात असताना संयुक्त खात्यात, शेअर्स, म्युच्युअल फंड, ठेवींच्या स्वरुपात ठेवली होती. जेनोबिया यांची काही वडिलोपार्जित मालमत्ताही होती. पतीचे २०१६ मध्ये निधन झाल्यानंतर मुलींनी आईच्या आजारपणाचा फायदा घेतला. त्यांनी जेनोबिया आणि त्यांच्या पतीच्या बनवट स्वाक्षऱ्या करुन मालमत्ता आणि अज्ञात व्यक्तींच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला आहे. जेनोबिया आपली व्यथा सांगताना म्हणाल्या, पती आणि मी कष्टाने मिळवलेली रक्कम मुलींनी वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करुन लॉकरमधून बनावट चावीच्या आधारे काढून घेतली. याबाबत बँकांच्या अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊनही त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करुन आरोपींनी स्वत:च्या खात्यात रक्कम जमा केली. या फसवणुकीविषयी पोलिसांना अनेकदा तक्रार दिली. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. कुठलीच दाद न दिल्याने श्रीवास्तव यांच्यामार्फत जेनोबिया यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
तक्रारदार पटेल या ८५ वर्षांच्या असून त्या कर्करोगाच्या रुग्ण आहेत. त्यांची जुबिन विवियन डिसुजा उर्फ जुबिन रुसी पटेल (मुलगी), रोमिना परवेझ खंबाटा, परवेज तालिब खंबाटा, योहान खंबाटा, क्रिस्टोफर लोझोडो, जसजीत सिंह निज्जर, सतीश सबनीस यांनी बँकेतील व्यवस्थापक, अधिकारी आणि अन्य आरोपीशी संगनमत करुन फ सवणूक केली असल्याची तक्रार जेनोबिया यांनी लष्कर भागातील न्यायालयाकडे केली.
अप्रामाणिकपणे आणि बनावट कागदपत्रे तयार करुन तक्रारकर्त्यांनी स्वाक्षरी केल्याचे दाखविण्याच्या हेतूने आणि त्यातून गैरमार्गाने लाभ मिळविण्याकरिता त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. अशाप्रकारे त्यांनी तक्रारदार आणि सरकारची फसवणूक केली आहे. आणि सत्य म्हणून घोषित करण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरुन तक्रारदारांना आर्थिक आणि मानसिक त्रास दिला असल्याचे अॅड. श्रीवास्तव यांनी सांगितले.