मुंबई - वेश्या व्यवसायासाठी नवजात बालकाची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा कक्ष - ९ कडून पर्दाफाश करण्यात आला आहे. आज सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद धराडे यांना वांद्रे पश्चिमेकडील कुरेशीनगर झोपडपट्टीसमोरील मैदानाजवळ काही महिला आणि पुरुषांची टोळी वेश्या व्यवसायाकरित नवजात बालिकेची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सापळा रचून महिला आणि पुरुषांच्या टोळीस वेश्या व्यवसायासाठी विक्रीस आणलेल्या एका स्त्री जातीच्या गोऱ्या रंगाच्या अंदाजे १५ ते २० दिवसाच्या बालिकेसह ताब्यात घेतले. याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे.
या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७० (४), ३४, जुवेनाईल जस्टीस ऍक्ट २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस चौकशीत १५ ते २० दिवसांचे नवजात अर्भक हे बिहार राज्यातील एका महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले असून बाळ जन्मदाती बिहारमधील महिलेने ताब्यात घेतलेल्या महिला आणि पुरुषाच्या टोळीला विकले होते. या टोळीत २३ वर्षीय महिला राहणारी गोवंडी, बैंगणवाडी अण्णा गल्ली, ५० वर्षीय महिला राहणारी चेंबूर, वाशीनाका, मुकुल नगर आणि बालिका विक्री करून पैसे ताब्यात घेतलेला २६ वर्षीय इसम राहणार चेंबूर, मुकुलनगर या सर्वांचा समावेश आहे.