कल्याण - देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवल्याने Excise अधिकारी आणि त्यांच्या पथकावर Excise कार्यालयासमोरच प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कल्याणात समोर आली आहे. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.कल्याण Excise विभागाचे एकसाईज अधिकारी सुनील कणसे यांना चिंचपाडा परिसरात एका अल्टो कारमध्ये काही जण देशी दारू घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. सुनील कणसे यांच्या सह त्यांच्या पथकाने सदर परिसरात सापळा रचला. यावेळी एक कार आली या कारमध्ये देशी दारू सापडल्याने कारचालक दीपक पगारे याला ताब्यात घेऊन Excise पथक कल्याण पश्चिमेकडील आपल्या कार्यालयात पोहचले. कार्यलयासमोर आधी त्यांची गाडी अडवली आणि नंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवून तुम्हाला कारवाईसाठी आम्हीच भेटतो का असा सवाल करत काठी, लोखंडी सळीने Exciseच्या पथकावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुनील कणसे यांच्यासह तीन कर्मचारी जखमी झाले. दरम्यान मारहाण करणाऱ्या टोळीतील काही जणांना पकडून Excise कर्मचाऱ्यांनी कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी राजेश चोळेकर, लहू म्हात्रे यांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.