नवी मुंबई - महिला रुग्ण व कंपाउंडर यांना वासनेचे बळी करणाऱ्या 55 वर्षीय डॉक्टर ला एनआरआय पोलिसांनीअटक केली आहे. दिवाळे गावात त्याचा दवाखाना असून महिला रूग्णच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना शरीरसंबंध ठेवायला भाग पडायचा.
डॉ. संजय लाड (५५) असे या डॉक्टर चे नाव असून याने क्लिनिकमध्ये कामास असलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर क्लिनिकमध्ये लैंगिक अत्याचार केला होता. सदर मुलीच्या तक्रारीवरून डॉ. लाड याला बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली एनआरआय पोलिसांनीअटक केली आहे. या नराधम डॉक्टरने त्याच्या क्लिनिकमध्ये यापूर्वी अनेक तरुणींवर तसेच उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.पीडित तरुणी जुईनगर येथे आपल्या आत्याकडे रहाण्यास असून नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली आहे. सुट्टी पडल्याने तिने डॉ. लाड यांच्या क्लिनिकमध्ये कामाला सुरुवात केली होती. १ एप्रिल रोजी दुपारी क्लिनिकमध्ये कुणीही नसताना डॉ. लाड याने पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर तणावाखाली असलेल्या मुलीने मडगाव येथे जाणारी एक्स्प्रेस पकडली. प्रवासादरम्यान ही मुलगी तणावग्रस्त असल्याचे एका महिला प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर तिने तिला बोलते केले. तिने तिच्यावर ओढवलेला सांगितल्यावर महिलने तिची समजूत घालत तिला डॉक्टरविरोधात तक्रार करण्यासाठी नवी मुंबईत पाठवून दिले. ही मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी क्लिनिक गाठले, मात्र डॉ. लाड याने ती दुपारीच निघून गेल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी एनआरआय पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी परतलेल्या या मुलीने घरच्यांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिल्यानंतर एनआरआय पोलिस ठाण्यात लाडविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री डॉ. लाड याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गुरुवारी त्याला ठाणे सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.डॉ. लाड हा बीएएमएस डॉक्टर असून तो गेल्या २० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात आहे. तसेच, तो गेल्या अनेक वर्षांपासून सीबीडी-बेलापूरमधील दिवाळे गावात आपले क्लिनिक चालवत आहे. डॉ. लाड हा तरुणींनाच कामाला ठेवत होता. त्यानंतर संधी साधून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने यापूर्वी त्याच्याकडे कामाला असलेल्या तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली आहे. उपचारासाठी येणाऱ्या गरीब घरातील तरुणी व महिलांनादेखील पैशांचे प्रलोभन दाखवून अथवा त्यांच्यावर फुकट उपचार करून त्यांच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.