मीरारोड - स्वाईप यंत्र वापरातील इन्व्हॉईस बेस्ड पद्धतीचा वापर करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचा तपास करत असताना अटक आरोपी कडून गुन्ह्यातील सह आरोपी पत्नीचा गुजरात मध्ये गेल्या वर्षी विहरीत ढकलून हत्या केल्याचा आणि मग मृतदेह शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार काशिमीरा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणला आहे .ट्रान्समार्ट डिजिटल कंपनीचे ललित शेठे यांनी १५ डिसेंबर २०१९ मध्ये दिलेल्या फिर्यादी नुसार काशिमीरा पोलिसांनी मैत्रीण ऑनलाईन कंपनीचे संचालक आशिष उकानी ( ३५ ) व त्याची दुसरी पत्नी निकिता कीर्तिकुमार दोषी उर्फ निकिता आशिष उकानी ( ३४ ) ह्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता . शेठे यांच्या कंपनीने उकाणी यांच्या कंपनीस ४ स्वाईप यंत्रे दिली होती . शेठे यांच्या कंपनीने दिलेल्या त्या एका क्रेडिट कार्ड मशीनचा इन्व्हॉईस बेस्ड पद्धतीचा वापर केला .त्या आधारे शोभित कुमार यांच्या क्रेडिट कार्डद्वारे २९ हजार रुपयांची मर्यादा असताना तब्बल १५ लाख ६५ हजार ९०० रुपये इतक्या स्कमेचा अपहार केला . ट्रान्समार्टला त्यांच्याशी संलग्न बँकेतून काढलेली रक्कम कळण्यास बँकेकडून कळवण्यात होणाऱ्या तांत्रिक विलंबाचा ते गैरफायदा घेत असत. सुरतमध्ये देखील आशिष याने २ कोटी ४० लाखांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे .काशिमीरा पोलीस त्यांच्या कडे दाखल सदर गुन्ह्या प्रकरणी आशिष व निकिताचा शोध घेत होते. परंतु आरोपी वारंवार त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्यामुळे पोलिसांना शोध लागत नव्हता. पोलिस आयुक्त सदानंद दाते, अप्पर पोलीस आयुक्त एस.जयकुमार, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर , सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप ह्यांच्या मार्गदर्शना खाली काशिमीराचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र चंदनकर व सुदर्शन पोतदार तसेच पोलीस कर्मचारी राहुल दाभाडे, संतोष तायडे, स्वप्नील मोहिले आदींनी तपास चालवला. पोलिसांना तांत्रिक माहितीवरून आरोपी गुजरातच्या सुरत भागात असल्याचे समल्यावर पोलिसांनी तडक गुजरात गाठले व ११ ऑक्टोबर रोजी आशिष उकानी ह्याला अटक केली. तो सुरतच्या मोटा वराचा भागातील हरिकृष्ण इमारतीत रहात होता .पोलिसांनी त्याच्या कडे सहआरोपी असलेली त्याची पत्नी निकिता बाबत कसून चौकशी केली असता सुरवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता . पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच अखेर त्याने तोंड उघडले आणि ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला . आशिषने पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले . १५ सप्टेंबर २०१९ मध्ये तो निकिताला घेऊन सुरतच्या वेलेंजा येथे महिनाभर राहिला . तेथून त्याने अमरेली ह्या मूळगावी निकिताला नेले. १५ ऑक्टोबरच्या पहाटे तो तिला घेऊन सेलना येथील एका शेतात गेला . तेथे सकाळ पर्यंत दारू प्यायला . गाडी व पैसे हे निकिताचे असल्याने त्यावरून दोघां मध्ये भांडण झाले आणि आशिषने निकिताला तेथील विहरीत ढकलून मारून टाकले . नंतर रश्शी आणून ती निकिताच्या मृतदेहास बांधली आणि गाडीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. शेतातच खड्डा करून त्यात मीठ टाकून मृतदेह पुरून टाकला .आशीषने पत्नीची हत्या केल्याचे कळताच पोलिसांनी तडक घटनास्थळ गाठले . स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या मदतीने निकटीचा मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा केला . चंदनकर यांनीच अमरेलीच्या वंडा पोलीस ठाण्यात सरकार तर्फे फिर्याद देऊन तेथे निकिताच्या खुनाचा गुन्हा दाखल केला . आशीषची पहिली पत्नी असून निकिता हि दुसरी पत्नी होती . आरोपीला फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून काशिमीरा पोलीस तपास करत आहेत.
धक्कादायक! फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक आरोपीकडून सहकारी आरोपी पत्नीची हत्या केल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 9:38 PM
Murder : पोलिसांना तांत्रिक माहितीवरून आरोपी गुजरातच्या सुरत भागात असल्याचे समल्यावर पोलिसांनी तडक गुजरात गाठले व ११ ऑक्टोबर रोजी आशिष उकानी ह्याला अटक केली. तो सुरतच्या मोटा वराचा भागातील हरिकृष्ण इमारतीत रहात होता .
ठळक मुद्देआशीषने पत्नीची हत्या केल्याचे कळताच पोलिसांनी तडक घटनास्थळ गाठले . स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या मदतीने निकटीचा मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा केला .