धक्कादायक...! उमरखेडच्या भाजप आमदाराचेच घर फोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:04 PM2019-08-11T17:04:20+5:302019-08-11T17:07:41+5:30
अद्याप पोलिसांत तक्रार नाही; लाखोंचा मुद्देमाल लंपास झाल्याची चर्चा
अविनाश खंदारे
उमरखेड (यवतमाळ) - येथील भाजप आमदार राजेंद्र नजरधने हे भाड्याने राहात असलेल्या घरी चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री डल्ला मारला. आमदार आणि त्यांचा परिवार घरी नसल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची चर्चा आहे. मात्र, वृत्तलिहिस्तोवर याप्रकरणी कोणतीही तक्रार झाली नव्हती.
गेल्या काही महिन्यांपासून शहर व तालुक्यात भुरट्या चोरांनी हैदोसे घातला आहे. आता खुद्द आमदारांच्या घरीच चोरी झाली. त्यामुळे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आमदार राजेंद्र नजरधने हे येथील बोरवनमधील एका घरी भाड्याने राहतात. शनिवारी मध्यरात्री घरी कुणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडले. रविवारी सकाळी बेलखेड येथील एक नागरिक आमदारांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आले. त्यावेळी त्यांना दरवाजा उघडा दिसला. कुलूप फोडलेले आढळले. त्या नागरिकाने लगेच आमदारांचे स्विय सहाय्यक अविनाश वजिराबादे यांना माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
गेल्या एक महिन्यापासून आमदारांचा परिवार मुलांच्या शिक्षणानिमित्त नागपूरला आहे. आमदार गेल्या तीन दिवसांपासून महागाव येथील त्यांच्या राहत्या घरी मुक्कामी आहे. घर फोडल्याची माहिती मिळताच आमदार राजेंद्र नजरधने यांनी रविवारी सकाळी १० वाजता उमरखेड गाठले. त्यांच्यासह उपाविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, उमरखेडचे ठाणेदार अनिल किनगे व पोलीस ताफा होता. यावेळी बघ्यांचीही गर्दी झाली होती. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व बेडरूममधील कपाट फोडले. त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. आमदार व पोलीस अधिकाºयांनी घराची पाहणी केली. मात्र चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही, हे त्यांच्या निदर्शनास आले. घरी कुठलीच मौल्यवान वस्तू अथवा रोख हाती लागले नसल्याने चोरट्यांना आमदारांच्या घरून खाली हात जावे लागले, असे सांगण्यात आले. तथापि चोरट्यांनी लाखोंच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची चर्चा शहरात सुरू होती. दरम्यान, याप्रकरणी आमदारांनी अधिकृतपणे पोलिसांत कोणतीही तक्रार केली नव्हती.
आमदारांचेच घर सुरक्षित नाही, सामान्यांचे काय
आमदारांचेच घर सुरक्षित नसेल, तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न आता सर्वत्र चर्चिला जात आहे. चोरट्यांनी आमदारांचे घर फोडले. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनेने पोलिसांची रात्र गस्त संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून त्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माझ्या घरी शनिवारी रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाची तोडफोड केली. बॅगमधील कापड अस्ताव्यस्त फेकले. मात्र कोणत्याही मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कमेची चोरी झाली नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार दिली नाही - राजेंद्र नजरधने, आमदार, उमरखेड
आमदार राजेंद्र नजरधने यांचे घर चोरट्यांनी फोडले. मात्र याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. - अनिल किनगे, ठाणेदार, उमरखेड