धक्कादायक! विद्यापीठांच्या गुणपत्रिकांची २ ते १५ हजारांत विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:42 AM2020-09-05T07:42:56+5:302020-09-05T07:43:13+5:30
गुन्हे शाखेने केला पर्दाफाश, दुकलीला अटक : बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : भारतातील विविध शैक्षणिक मंडळे आणि विद्यापीठांच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रांची २ ते १५ हजार रुपयांत विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने मुनावर अहमद सय्यद (३४) आणि हासमुद्दीन खैरुद्दीन शहा (३३) या दुकलीला अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष २ ला या टोळीबाबत समजताच, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, तपास अधिकारी मिलिंद काठे, संतोष साळुंखे, गुंडेवाड, राणे, पटेल आणि अंमलदार यांनी तपास सुरू केला. एका बनावट ग्राहकाच्या मदतीने पथकाने सय्यदशी भेट घेतली. त्यानुसार आरोपीने दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिका, वाणिज्य शाखेचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या प्रमाणपत्रासाठी १९ हजार ६०० रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार पैसे देत व्यवहार ठरवला. ठरल्याप्रमाणे २ सप्टेंबर रोजी आरोपीने प्रमाणपत्र तयार झाल्याचे सांगून, ते घेण्याकरिता वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ३ सप्टेंबर रोजी येण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. दुचाकीवरून आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेने ताब्यात घेत त्याच्याकडील बनावट प्रमाणपत्रे जप्त केली. त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
आरोपीच्या चौकशीतून पथकाने चेंबूरच्या वाशी नाका परिसरात छापा टाकला. तेथे शहाच्या कार्यालयातील संगणकावर विविध शैक्षणिक मंडळ, विद्यापीठ यांच्या गुणपत्रिका, ना हरकत प्रमाणपत्रे, शिक्के मिळून आले. कागदपत्रासह संगणक पथकाने जप्त केले. शुक्रवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले. दोघांनाही ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संगणकावरच चालायचा कारभार
मुनावर याने पोलिसांना दिलेल्या माहितीत गेल्या सहा महिन्यांपासून तो अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्र देण्याचे काम करत आहे. पोलिसांना त्यांच्याकडून १० ते १२ प्रमाणपत्रे मिळाली आहेत. तसेच संगणकावरूनच ही मंडळी हुबेहूब असे प्रमाणपत्र बनवत होती. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.