सातारा – जिल्ह्यातील पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यात एका अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदारासह १९ जणांवर पोलिसांनी ३०२ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. साखर कारखान्यात झालेल्या साखरेच्या अफरातफरीतून ही मारहाण झाल्याचं समोर आलं आहे, या मारहाणीत अधिकाऱ्याला इतकं मारलं की उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून जगदीप थोरात कार्यरत होते, १० मार्च रोजी थोरात यांच्यावर साखरेची हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला, या आरोपावरून त्यांना कारखान्यातच मारहाण करण्यात आली, यानंतर जगदीप थोरात यांना ११ तारखेच्या पहाटे त्रास होऊ लागला, नातेवाईकांनी त्यांना तात्काळ कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं, परंतु उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.
कराड शहर पोलीस ठाण्यात जगदीप थोरात यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली, परंतु जगदीप थोरात यांच्या मृत्युनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, या प्रकरणी पोलिसांनी थोरात यांच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे ,सहसंचालक मनोज घोरपडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि काही कर्मचाऱ्यांविरोधात कलम ३०२ प्रमाणे वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहसंचालक मनोज घोरपडे यांच्यासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली आहे.
मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबाचा पवित्रा
जगदीप थोरात यांच्या मृत्यूनंतर जोपर्यंत त्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा थोरात यांच्या नातेवाईकांनी घेतला होता, त्यानंतर तणाव निर्माण झाला, रात्री उशिरा वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात थोरात यांचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला होता, त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रात्री नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर गोवारे येथे अंत्यसंस्कार केले.