डोंबिवली - तिकीट विचारल्याने उर्मट प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वे स्थानकात घडली आहे. टीसीच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी उर्मट रेल्वे प्रवाशाला बेड्या ठोकल्या आहेत. जानू वळवी असं मारहाण झालेल्या टीसीचं नाव आहे. तर अटक आरोपीचं नाव किशन परमार असं आहे.
वळवी हे आज सकाळी कोपर रेल्वे स्थानकात तिकीट तपासण्याचं काम करत होते. दरम्यान किशन परमार या २० वर्षीय तरुणाला त्यांनी तिकीट तपासणीसाठी तिकीट विचारलं. त्यावरून या दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाले. नंतर किशन याने वळवी यांना मारहाण केली. यावेळी स्थानकावर उपस्थित रेल्वे पोलिसांनी किशन परमारला पकडून ताब्यात घेतलं. याप्रकरणी मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात किशन परमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
किशन परमार याच्या कुटुंबीयांनी मात्र टीसीनेच आपल्या मुलाला विनाकारण मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आपल्या मुलाकडे तिकीट असूनही टीसीने त्याच्यावर दादागिरी करत कॉलर पकडून ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि तेथे मारहाण केली, असं किशन परमारच्या वडिलांचं म्हणणं आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत. किशनच्या वडिलांचं देखील म्हणणं पोलिसांनी ऐकून कोपर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीची देखील पोलीस पडताळणी करत आहेत.