सिद्राममळा येथील खुनाचा उलगडा, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 01:16 AM2018-11-05T01:16:31+5:302018-11-05T01:17:03+5:30
सिद्राममळा परिसरात नवा व जुना मुठा कालव्याच्यामधील मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून खून केलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या खुनाचे गूढ उकलण्यास गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
लोणी काळभोर - येथील तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील सिद्राममळा परिसरात नवा व जुना मुठा कालव्याच्यामधील मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून खून केलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या खुनाचे गूढ उकलण्यास गुन्हे शोध पथकाला यश आले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सचिन सुुुभाष कदम (वय ३४, रा. जयहिंंदनगर, जुनी महाराष्ट्र बँकेमागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली) आणि रोहन ऊर्फ भैया अनिल चव्हाण (वय २५, पाषाणकरबाग, पिठाच्या गिरणीमागे, लोणी काळभोर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या अभिजित वाल्मीक काळभोर (वय २६, रा. समतानगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याचा मृतदेह २ नोव्हेंबरला दुपारी ३.४५ च्या सुमारास तीर्थक्षेत्र रामदराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिद्राममळा परिसरातील नवा व जुना मुठा कालव्याच्यामधील पाटबंंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत आढळला होता.
याप्रकरणी अभिजितचा भाऊ मेघराज वाल्मीक काळभोर याने फिर्याद दिली होती. पुणे, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवान, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समीर चमनशेख, सचिन मोरे, सागर कडू, परशुराम सांगळे यांनी गुन्ह्याचा सखोल अभ्यास केला. खून कदम व चव्हाण यांनी केला, याची खात्री पटल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. अभिजित काळभोर त्याला दारू पिऊन वारंवार त्रास देऊन दहशतीखाली ठेवून त्याने काम करून आणलेली रक्कम तो धाक दाखवून काढून घेत होता. तसेच त्यास शिवीगाळ करून वारंवार अपमानास्पद वागणूक देत होता. कदम राहत असलेल्या परिसरात त्याच्या भावाची लहान मुुलगी घराच्यासमोर खेळत असताना मृत अभिजित याने तिच्या अंगावर गाडी घातल्याचा राग कदम याच्या मनात होता. यातूनच त्यांनी खून केला.