चंडीगड : पंजाबमधील लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचे धागेदोरे महाराष्ट्रात अरुण गवळी टोळीपर्यंत पोहोचले आहेत. पंजाब पोलिसांनी ज्या आठ शार्प शूटरची ओळख पटवली आहे, त्यातील एकाचे नाव संतोष जाधव असून, तो पुण्याचा रहिवासी आहे व तो अरुण गवळी टोळीशी संबंधित आहे.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव याला खास मुंबईहून बोलावून घेण्यात आले. मुसेवाला याच्यावर २९ मे रोजी गोळ्या झाडणाऱ्यांत तोही सामील होता. त्याच्याबरोबर महाराष्ट्रातून सौरभ महाकाल हासुद्धा मानसामध्ये आला होता. अरुण गवळी सध्या महाराष्ट्रातील जेलमध्ये बंद आहे. पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना ही माहिती पुरवली असून, पुढील तपासासाठी मदत मागितली आहे.
केकडाचे नातेवाईक मुसा गावात मुसेवालाची रेकी करून हल्लेखोरांना माहिती दिल्याच्या आरोपाखाली हरयाणातील सिरसामध्ये अटक केलेल्या संदीप ऊर्फ केकडा याच्याबाबत पोलिसांना अधिक माहिती मिळाली असून, मुसा गावात त्याची मावशी राहते. त्याला लागून असलेल्या रामदत्ता गावात त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता. त्यामुळे त्याचे येणे-जाणे होते. केकडा हा व्यसनी होता, असेही समजते.