पुणे (विमाननगर): येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या नितीन कसबे याचा बुधवारी रात्री तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. कुणाल किसन जाधव (वय20, रा. खराडी), अभिषेक उर्फ अभय नारायण पाटील (वय 19 रा. लोहगाव), अक्षय सतीश सोनवणे(वय 20, रा. कामराजनगर येरवडा), आकाश उर्फ टक्क्या भगवान मिरे (वय 23, रा. सेवक चौक येरवडा), अर्जुन दशरथ मस्के(वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी पाच जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यासोबतच गुन्ह्यातील आणखी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नितीन कसबे याच्यावर दहा ते पंधरा हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला होता. खूनाचा गंभीर गुन्हा करून सर्व आरोपी फरार झाले होते. गंभीर गुन्ह्यातील सहा आरोपींना येरवडा पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक केली. पंचशीलनगर येथे सोमवारी रात्री प्रतीक वन्नाळे या युवकाचा किरकोळ वादातून आठ जणांनी कुऱ्हाड दगडाने ठेचून खून केला होता. गंभीर घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी येरवडा नितीन कसबे या पूर्व रेकॉर्डवरील आरोपीचा हल्लेखोरांनी खून केला. तीन दिवसात झालेल्या दोन खूनांच्या गंभीर गुन्ह्यांमुळे येरवडा व परिसरात खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या वाढतो संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगार वैयक्तिक जामिनावर बाहेर येत आहेत. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून परिसरात गुन्हे घडत आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी येरवडा सह परिमंडळ 4 विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.येरवडा परिसरातील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी नागरिकांनी तात्काळ येरवडा पोलीस स्टेशन अथवा पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 4 येरवडा क्षेत्रीय कार्यालय येरवडा याठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.