- सागर नेवरेकरमुंबई - शिवडी कोळीवाड्यामध्ये एका राहत्या घरी नाग सर्प आढळून आला. शाहनबाज शेख यांच्या घरी हा सर्प शिरला होता. अंदाजे एक फुटाचा नाग होता. सर्पाला पकडताना सर्पमित्र राजू सोलंकी (२०) यांना सर्पदंश झाला. उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
घरामध्ये सर्प आढळून आल्याची माहिती मिळताच सर्प पकडण्यासाठी सर्पमित्र राजू सोळंखी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सर्पाला सुखरूप पकडण्यात आले. परंतु पकडलेला सर्प प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरताना सर्पाने उलट्या दिशेने फिरून राजू सोलंकी यांच्या उजव्या हाताच्या बोटावर दंश केला. ही घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
राजू यांना सर्प चावला असतानाही त्यांनी हातातले काम सोडले नाही. त्याने सर्पाला बाटलीमध्ये भरून घेऊन गेला. सापडलेला सर्प हा मोठा नसून छोटे पिल्लू होते. त्यामुळे मला काही होणार नाही, असेही राजू सोलंकी यांनी तेथील नागरिकांना सांगितले. परंतु सर्पदंश झालेला हात जास्तच सुजला होता. राजू यांनी त्वरीत केईएम रूग्णालय गाठले. रूग्णालयात त्यांना चक्कर आली आणि जमिनीवर कोसळला. यावेळी केईएम रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.