सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 01:40 AM2020-06-07T01:40:16+5:302020-06-07T01:40:41+5:30
बनावट कागदपत्रे तयार करून एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री प्रकरण
पुणे : फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना न्यायालयाने शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. देशपांडे यांनी हा आदेश दिला. काळे यांनी अॅड. प्रशांत जाधव यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. रविवारी दुपारी एक ते चार यावेळेत सांगवी पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहायचे. तपासात सहकार्य करण्याचे या अटींवर व 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर काळे यांची सुटका करण्यात आली. काळे यांनी 2002 मध्ये पिंपळे-निलख येथील औंदूंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी सिंधू सुभाष चव्हाण (रा. कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काळे यांच्या विरोधात 4 मे 2019 ला सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार सांगवी ठाण्यातील उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांचे पथक 29 मेला सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले. काळे यांना ताब्यात घेऊन हे पथक त्याच दिवशी रात्री शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यांना शिंका येऊ लागल्याने उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र ताप आणि शिंका असल्याने पोलिसांनी काळे यांना रूग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. पण त्यांना सोडून देण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सांगवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.