पिंपरी : जावई दारू पिऊन मुलीला त्रास देत असल्याने तसेच त्यांच्यात सतत होणाऱ्या भांडणाला वैतागून जावयाचा खून झाल्याची घटना चऱ्होली या ठिकाणी घडली. याप्रकरणी सासरे हनुमंत ज्ञानोबा सोनावणे व मेहुणा किरण हनुमंत सोनावणे यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या वडिलांनी या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. उदय लोखंडे (वय ३५) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. फिर्यादी यांचा मुलगा उदय यास दारूचे व्यसन होते. इतर कौटुंबिक कारणांमुळे त्याची व पत्नीची भांडणे व्हायची. नवरा-बायकोच्या सततच्या भांडणाला कंटाळून व तसेच त्यांच्या वेगळे राहण्याच्या कारणावरून उदयचे सासरे व मेहुणा यांच्यात वादावादी झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. या वेळी उदय याच्यावर हत्याराने वार करण्यात आले असून त्याच्या डोक्यावर, हाता-पायांवर व पाठीवर जखमा असल्याचे दिसून आले आहे. या हल्ल्यात उदयचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आळंदी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
जावई दारू पिऊन मुलीला त्रास द्यायचा; सासरा आणि मेहुण्याने केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 6:39 PM
नवरा बायकोच्या सततच्या भांडणाला कंटाळून उचलले पाऊल
ठळक मुद्देआळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल