डोंबिवली - विशाखापट्टणम एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका प्रवाशाची ३९ ग्रॅम ७०० मिली ग्रॅम वजनाची सोनसाखळी धावत्यालोकलमधून गळयातून हिसकावून चोरल्याची घटना ऑगस्ट महिन्यात कल्याण रेल्वे स्थानकात घडली होती. ती चोरी करणारऱ्या अट्टल चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुरूवारी अटक केली असता त्याने ठाणे स्थानकातही यापूर्वी असा गुन्हा केला असल्याची उकल करण्यात आली.सम्राट अशोक शिंदे उर्फ संभा उर्फ सॅम (वय २४) असे या अट्टल चोराचे नाव असून तो कोळसेवाडी, कल्याण पूर्व, या ठिकाणी राहतो. धावत्या लोकल गाड्यांमधील प्रवाशांना लक्ष्य करत त्यांच्या बेसावधपणाचा अंदाज घेत तो असे कृत्य करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिनकर पिंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ऑगस्ट महिन्यापासून सापळा रचला होता. विशेषत: कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ व ७ या ठिकाणी त्यांनी पथक तैनात केले होते. त्यामध्ये महिला पोलिस निरिक्षक सुरेखा मेढे, पोलिस निरिक्षक अविनाश आंधळे, विकास भिंगारदिवे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस सहकारी आदींचा समावेश होता. त्यांनी रचलेल्या सापळयानुसार खबऱ्यांच्या माहितीवरून सांभा यास अटक करण्यात आली. त्यामध्ये त्याने विशाखापटटणम एक्स्प्रेसमधील प्रवाशाचे रेल्वे गाडी सुरू होताच सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. असे अनेकदा त्याने केले असल्याचे पोलीस चौकशीत निदर्शनास आले. त्यानुसार त्याची चौकशी केली असता ठाणे स्थानकातही अशी घटना केल्याचे त्याने कबुल केले. त्याच्याकडून कल्याण व ठाणे स्थानकातील चो-यांची उकल करण्यात आली. त्यासह अन्य गुन्ह्यांमधील एकूण ८२ ग्रॅम ७०० मिलीग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ३ हजार ६८० रूपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आल्याची माहिती पिंगळे यांनी दिली. संभा यास अटक करण्यात आली असून कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आल्याचे ते म्हणाले.
धावत्या लोकलमधून सोनसाखळी लंपास करणारा अट्टल चोरटा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 4:54 PM