मुंबई - निरा विक्रीच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर त्याचे नुतनीकरण होईपर्यंत कारवाई करु नये, यासाठी एका ताडी विक्रेत्यामार्फत १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिपायाला सापळा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) रचून अटक केली आहे. सुमेध शिवाजी सरकटे (वय ३४, रा. शिव वैभव सोसायटी, ऐरोली, नवी मुंबई) आणि ताडी विक्रेता रमेश नारायण बंडी (वय ३८, रा. लोअर परेल) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार यांचा निरा विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या विक्री परवान्याची मुदत संपल्याने त्यांनी नवीन परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. तोपर्यंत कायदेशीर कारवाई करु नये, यासाठी ऑपेरा हाऊस येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील शिपाई सुमेध सरकटे याने १६ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार केली. तडजोडअंती १० हजार रुपये लाच घेण्याचे सरकटे यांनी मान्य केले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. लोअर परेल येथील पुलाखाली किस्मत ताडी माडी केंद्र चालविणाऱ्या रमेश बंडी याच्यामार्फत १० हजार रुपये स्वीकारताना एसीबीने पकडले.