बलिया - बलिया गोळीबारातील मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने (STF) लखनऊच्या जनेश्वर मिश्र पार्कमधून धीरेंद्रला रविवारी सकाळी अटक केल्याची माहिती मिळत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर धीरेंद्र घटनास्थळावरून फरार होता. त्याच्यावर 50 हजार रुपयांचं बक्षीसही घोषित करण्यात आलं होतं. बलियामध्ये झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात येत होता.
धीरेंद्र सिंहने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत स्वत: निष्पाप असल्याचं सांगितलं होतं. धीरेंद्र सिंह याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशपोलिसांचे 10 गट काम करत होते. आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) आणि गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचं याअगोदरच पोलिसांनी जाहीर केलं होतं. बलिया गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे. बलियामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोरच भाजपाच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून योगी सरकार अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. एक बैठक सुरू असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला. पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबायांनी आरोपी फरार झाल्याने त्याचा आरोप पोलिसांवर केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण झाला आणि गोळीबार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. धीरेंद्र सिंह भाजपा आमदाराचे निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जात आहे. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरू झाली. सोशल मीडियावर घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.