मुंबई - शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज पुरविणाऱ्या तस्करांची साखळी तोडण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज फ्री कॅम्पस मोहीम अधिक तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी घाटकोपर येथील शाळा- कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरविणाऱ्या चौघांना शनिवारी अटक केली. या चौघांकडून पोलिसांनी पाच किलो गांजा जप्त केला आहे. शाहिद इक्बाल शेख, कयूम नूर मोहम्मद शेख, अनिस शेख आणि मोहम्मद अली जाफर शेख अशी या चौघांची नावे असून झडतीमध्ये एक लाखाचा गांजा सापडला. हे चोघेही आजूबाजूच्या परिसरात राहणारे असून त्यांच्यापर्यंत गांजा कोणी पोहचविला याचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच हे चौघे कुठे आणि किती जणांपर्यंत ड्रग्ज पोहचवितात हे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट होईल असे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मुंबईतील कॉलेजमध्ये ड्रग्ज पुरविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाची नियमित गस्त सुरु असते. घाटकोपरच्या वैतागवाडी परिसरातील एका कॉलेजजवळ काही इसम बॅगा लावून संशयास्पदरित्या फिरत असल्याचे घाटकोपर युनिटचे उपनिरिक्षक चारू चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन कॉलेजजवळ सापळा लावला आणि चौघांना अटक केली. हे चौघे हा गांजा कोणाला देण्यासाठी आले होते याचा तपास पोलिस करीत आहेत.