एटीएम चोरी प्रकरणातल्या आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:21 PM2020-06-22T12:21:31+5:302020-06-22T12:22:43+5:30
पोलिसांनी आपल्याकडे चौकशी करू नये म्हणून पॅन्ट चेनच्या रनरने केले स्वतःवर वार
पिंपरी : चिंचवड येथील थरमॅक्स चौकातून बँकेचे एटीएमचोरून नेणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत पोलिसांनी आपल्याकडे चौकशी करू नये यासाठी एका आरोपीने स्वतःच्या पॅन्टच्या चेनच्या रनरने स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये रविवारी (दि. २०) दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर आणखी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.
अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय २०, रा. हडपसर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विश्वास कदम यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थरमॅक्स चौक येथील बँकेचे एटीएम चोरीचा प्रकार ९ जून रोजी पहाटे घडला. पाच चोरटे पिकअप व्हॅनमधून आले. त्यांनी एटीएमला दोरखंड बांधला आणि एटीएम बाहेर ओढून काढले. त्यामुळे एटीएम सेंटरमधील धोक्याची सूचना देणारा सायरन वाजला. सायरन वाजत असतानाही चोरट्यांनी ओढून बाहेर आणलेले एटीएम गाडीत टाकले आणि धूम ठोकली.
सायरनचा आवाज ऐकून जवळच असणारा एक सुरक्षा रक्षक सावध झाला. त्याने दुसऱ्या एकाच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षास याबाबतची माहिती दिली. या एटीएममध्ये ७ जून रोजी दहा लाखांची रोकड भरली होती. ९ जून रोजी पाच लाख ७१ हजारांची रोकड शिल्लक होती. चोरट्यांनी रोख रकमेसह एटीएम चोरून नेले.
पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी शिताफीने अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी, शेऱ्या उर्फ श्रीकांत विनोद धोत्रे (वय २३, रा. गाडीतळ हडपसर) यांना अटक केली. त्यांच्याकडून फोडलेले एटीएम, रोख रक्कम, पीकअप व्हॅन आणि अन्य मुद्देमाल जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणला.
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दोन्ही आरोपींना निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे पोलिसांनी अजयसिंग या आरोपीला पिंपरी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले होते.
रविवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक कोकाटे त्याच्याकडे चौकशी करणार होते. पोलिसांनी आपल्याकडे चौकशी करू नये, यासाठी अजयसिंग याने त्याच्या पॅन्टच्या चेनचा रनर तोडला. रनरच्या सहाय्याने त्याने स्वतःच्या हातावर आणि मानेवर जखमा करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत अजयसिंग याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.