भिवंडी - भिवंडी शहरातील नागाव सलामतपुरा परिसरात असलेल्या अन्सारी साफिया गर्ल्स ऊर्दु हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने चाचणी परीक्षा संपल्यानंतर शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिला उपचारासाठी मुंबईत नेत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. या घटनेने शाळेय विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख ( वय 14 , रा. फातमा नगर ) असे शाळेच्या पाचव्या मजल्यावरून आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. मुबशीरा ही अन्सारी साफिया गर्ल्स ऊर्दु हायस्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. शाळेत सध्या चाचणी परीक्षा सुरु असून आज इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा पेपर होता. सकाळी साडेसात वाजता मुबशीरा शेख ही शाळेत आली व पहिल्या मजल्या वरील वर्ग खोलीत परीक्षेसाठी बसली. साडे नऊ वाजता पेपर सुटल्यावर ती पहिल्या मजल्यावरुन शाळेच्या पाचव्या मजल्यावर जाऊन तेथील गॅलरीततून तिने दहा वाजताच्या सुमारास थेट खाली उडी मारुन आत्महत्या केली. पाचव्या मजल्यावरून मुबशीरा थेट शाळेसमोरच्या पटांगणात वेगाने आपटून पडली. त्यावेळी काही विद्यार्थीनी व-हांड्यात उभ्या असल्याने त्यांना जोरात काही तरी आदळल्याचा आवाज आला असता मुली तेथे धावून आल्या. तात्काळ शाळेतील शिपाई यांनी तेथे धाव घेत जखमी मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख हिला जखमी अवस्थेत उचलुन वंजारपट्टी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. परंतु त्यांनी सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्यावर तिला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र, प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारासाठी जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या मृत्यूची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.