माजलगाव (बीड ) : तालुक्यातील तालखेड येथील सुमित वाघमारे याचा डिसेंबर २०१८ मध्ये बीड येथे निर्घुण खून झाला होता. त्याची पत्नी भाग्यश्री हिने तालखेड येथील राहत्या घरी बुधवारी सायंकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
बीड येथील आदित्य कॉलेज समोर डिसेंबर २०१८ मध्ये सुमित वाघमारे या युवकाचा पत्नीच्या भावाने निर्घुण खून केला होता. बहिणीसोबत लग्नाला विरोध असल्याने सुमितच्या मेहुण्याने भाग्यश्री या आपल्या बहिणीसमोरच भररस्त्यात त्याची हत्या केली होती. त्यानंतर भाग्यश्रीला दोन पोलिसांचा बंदोबस्त होता.
ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी.. हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे.
दरम्यान, न्यायालयीन खटला सुरु असताना भाग्यश्रीला नातेवाईकांनी धमकी दिल्याच्या घटना घडल्या होत्या. ती तालखेड येथे सासरी राहत होती. तिने पोलिस असताना बुधवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले होते. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याबाबत माहिती मिळू शकली नाही.
काय आहे सुमित वाघमारे खून प्रकरण
तालुक्यातील तालखेड येथील सुमित वाघमारे हा बीड येथे नागोबा गल्लीत राहत असे. सुमित हा आदित्य इंजिनिअरींग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. याच वर्गात भाग्यश्री शिकत होती. या दोघांची मैत्री झाली. मैत्रीतून प्रेम आणि नंतर दीड महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. हा विवाह तिच्या भावाला खटकला होता. त्यामुळे त्याच्या मनात सुमितबद्दल राग होता. याबाबत त्यांच्यात अनेकदा वादही झाले. १९ डिसेंबर २०१८ ला भाग्यश्री व तिचा पती सुमित दोघेहीे परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेले होते. परीक्षा देऊन सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असतानाच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पांढऱ्या कारमधून (एमएच २३ - ३२५३) तिचा भाऊ बालाजी लांडगे व त्याचा मित्र संकेत (पूर्ण नाव कळू शकले नाही) हे दोघे आले व कारमधून उतरत त्यांनी सुमितवर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि कारमध्ये बसून सुसाट निघून गेले, असे सदर मुलीने संगितले. ओरडत तिने मदतीची मागणी केली, दरम्यान एका रिक्षाचालकाने धाव घेत सुमितला रिक्षात घालून जिल्हा रूग्णालयात आणले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला असल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.