मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाला आहे. ईडी आता त्याची चौकशी करत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायब झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाली होती. ईडीने रियाकडे सुशांतच्या खात्यातील १५ कोटींच्या व्यवहारांबाबत ९ तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू होती. तर दुसरीकडे सुशांत आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांकड़ून चौकशी सुरू होती.बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. गुरूवारी ईडीने रियाला समन्स बजाविले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने वकीलामार्फत केली होती. ईडीने ती फेटाळली आणि चौकशीसाठी हजर न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद करताच, शुक्रवारी रिया चौकशीसाठी सकाळी ११.५५ वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचली. यावेळी तिचा भाऊ शोविकही तिच्यासोबत होता.रियाचे खार आणि नवी मुंबईत दोन फ्लॅट आहेत. यापैकी खार येथील फ्लॅट तिने २०१८ मध्ये आई आणि स्वत:च्या नावावर खरेदी केला. त्याची किंमत ७६ लाख असून, अन्य कर धरुन हा फ्लॅट ८० लाखांवर गेला आहे. मात्र सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वी तिने यात गुंतवणूक केल्याचे समजते. तसेच आतापर्यंत ४५ टक्के पैसे तिने दिल्याचेही संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर विशाल जाधव यांनी सांगितले. मात्र रियाचे वार्षिक उत्पन्न १० ते १४ लाख असताना तिने एवढी गुंतवणूक कशी आणि कुठून केली? याबाबतही ईडी अधिक तपास करत आहेत. विविध कंपनीबाबत, तसेच सुशांतकडून आतापर्यंत किती पैसे घेतले? अशा ५० प्रश्नांबाबत ईडी चौकशी करत आहे. तिच्याकडे गेल्या पाच वर्षांत आयटीआर, बँक स्टेटमेंट मागण्यात आले आहे. मात्र कागदपत्रे नसल्याने तिने वकिलांमार्फत संबंधित कागदपत्रे पाठविणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, सुशांतची माजी मॅनेजर आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदीनेही ईडीच्या समन्सनुसार दुपारी दोन वाजता कार्यालय गाठले. तिचीही चौकशी करण्यात आली. श्रुतीनंतर सुशांतचा मित्र आणि त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी याची शनिवारी चौकशी होणार आहे. त्यालाही ईडीकडून समन्स बजाविण्यात आले आहेत.नवी मुंबईतील कंपनीची झाडाझडतीपार्टनरशीपमध्ये सुशांतने ३ कंपन्या सुरू केल्या. यात नवी मुंबईतील सुशांत, रिया, शोविकने तयार कलेल्या विविड्रेज रिआलिटी कंपनीकडे ईडीने लक्ष केंद्रित केले आहे. या कंपनीसाठी वापरलेले कार्यालय रियाचे वडील इंद्रजीत यांच्या नावे आहे. तसेच रियाने या कंपनीचे नावही बदलल्याचे समोर आले आहे.