मुंबईवर २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी: संशयिताला विरारमधून अटक, मुंबई पोलीस आणि एटीएसकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 10:57 PM2022-08-20T22:57:10+5:302022-08-20T22:57:40+5:30
Crime News: मुंबईत २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी देणारे संदेश मुंबई पोलिसांना पाकिस्तान कोड असलेल्या फोन नंबरवरून आले होते, असे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा - मुंबईत २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी देणारे संदेश मुंबई पोलिसांना पाकिस्तान कोड असलेल्या फोन नंबरवरून आले होते, असे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले आहे. याबाबत एका संशयिताला विरार पुर्वेमधून अटक करण्यात आली असून एटीएसकडून कसून चौकशी सुरु आहे.
विरारमधील भाटपाडा परिसरातून एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद आसीफ (२२) तरूणाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंबई गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संशयित आरोपी तरूणाची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेली व्यक्ती उत्तरप्रदेशातली आहे.
शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर अनेक धमकीचे मजकूर प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. देण्यात आलेल्या मॅसेजमध्ये हल्ला करुन शहर उडवलं जाईल असा मॅसेज दिला होता. शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले की मुंबईला २६/११ हल्ल्यासारखे उडवण्याचे धमकीचे संदेश पाकिस्तान कोड असलेल्या नंबरवरून आले होते. त्यामुळे पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. आम्ही सगळे संदेश गांभीर्याने घेतले आहेत. धमकीच्या संदेशांची चौकशी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही किनारपट्टीच्या सुरक्षेबाबत सतर्क आहोत आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधत आहोत असेही त्यांनी जाहीर केले आहे.