संतापजनक! चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने बलात्कार पीडितेला केले हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:14 PM2020-12-31T12:14:19+5:302020-12-31T12:17:43+5:30
Beed Crime News : पीडित महिलेच्याच चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने तिला गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीड - बलात्कार पीडित महिलेला मानसिक आधार द्यायचे राहिले दूर, पीडित महिलेच्याच चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने तिला गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली आहे. दरम्यान, पीडित महिलेला विरोध करत या गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या दिल्याचेही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेवर गावातील चार जणांनी काही वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपींविरोधात खटला चालून न्यायालयाने संबंधितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र ही बाब गावकऱ्यांना रुचली नव्हती. या प्रकरणात न्यायालयाने पीडितेच्या बाजूने न्याय दिल्यानंतरही गावातून सदर महिलेला त्रास देण्यास सुरुवात झाली.
Maharashtra: Rape survivor from Beed District alleges that her village panchayat has passed a resolution to banish her from the village
— ANI (@ANI) December 31, 2020
Block Development Officer says,"On Aug15, gram sabha passed a resolution to banish her.A report on this will be submitted to senior officials." pic.twitter.com/61u53p1MxC
धक्कादायक बाब म्हणजे गावातील ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक, सरपंच आदी मंडळीही या महिलेविरोधात उभे राहिले. सदर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला आणि तिच्या कुटुंबीयांना गावातून हाकलण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला.
हे कमी म्हणून की काय, या गावामधील ग्रामस्थांनी सदर महिलेविरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊनही गोंधळ घातला. पीडित महिलेला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. या जमावाच्या तावडीतून सदर पीडित महिला आणि तिची मुले कशाबशा जीव वाचवून बाहेर पडल्या.