Param Bir Singh: "नाेकरीत परत घेण्यासाठी २ काेटी तर कारवाई न करण्यासाठी ५० लाखाची मागणी"; परमबीर सिंगांवर धक्कादायक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 06:38 AM2021-03-22T06:38:13+5:302021-03-22T06:38:47+5:30
कारवाई न करण्यासाठी ५० लाख मागितल्याचा पाेलीस निरीक्षक अनुप डांगे यांचा आराेप
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली असताना, रविवारी पबवर केलेल्या कारवाईच्या रागात परमबीर यांनी आपले निलंबन केल्याचा आरोप करत, गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृह सचिवांकड़े तक्रार केल्याचे पत्र व्हायरल झाले आहे. यात, निलंबन न करण्यासाठी ५० लाख तर निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
डांगे यांनी २ फेब्रुवारी रोजी याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. त्यात त्यांनी केलेल्या आरोपानुसार, गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ रोजी कारवाई केली होती.
या कारवाई दरम्यान पबचा मालक जीतू नावलानी याने तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत ‘घरके रिलेशन है’ असे सांगून कारवाईस विरोध केला. पुढे, तेथे धडकलेल्या त्याच्या अन्य दोन मित्रांनी पोलिसांना दमदाटी केली. शिवाय, मारहाणही केली. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात आणताच तेथेही गोंधळ घालत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पुढे हाच गुन्हा मागे घेण्यासाठी वरिष्ठांचा दबाव वाढला. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम कैद आहे. अशात यात दुसरा गुन्हा दाखल केला.
या प्रकारानंतर २५ नोव्हेंबर रोजी एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंग यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा कॉल आला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगताच, तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भेटीला जाण्यास नकार दिला. त्याबाबत संबंधित एसीबी कार्यालयात कळविण्यात आले. त्यानंतर परमबीर सिंग यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच, माझ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु झाली. पुढे ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली. पाठोपाठ १८ जुलै रोजी माझे निलंबन झाले. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबविण्यासाठी ५० लाखांची मागणी केली होती. पुढे कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा आरोप यात केला आहे. तसेच यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही नमूद करत यात, त्याने जितेंद्र नवलानी, भरत शाह, राजीव भरत शाह आणि अन्य संबंधितांबाबत मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. परमबीर यांचे त्यांच्यासोबत असलेल्या कनेक्शनची तसेच दाखल गुन्ह्यांबाबतही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आकसातून परमबीर सिंग यांनी केली कारवाई
परमबीर सिंग यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच, आपली विभागीय चौकशी सुरु झाली. पुढे ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली. पाठोपाठ निलंबन झाले. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबविण्यासाठी ५० लाखांची मागणी केली होती. पुढे कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा आरोप निरीक्षक अनुप डांगे यांनी केला आहे.