नवी मुंबई - मध्यरात्रीच्या सुमारास कामावरुन घरी चाललेल्या महिला व पुरुषाला खोटय़ा गुन्ह्यात अडवण्याची भिती दाखवून पैशाची मागणी करणाऱ्या पाच पोलीसांचे निलंबन करण्यात आले आहे. ते रबाळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी असून पिडीत महिला व पुरुषाने केलेल्या तक्रारीवरुन चौकशीअंती त्या पोलीसांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी कारवाईची भिती दाखवून जबरदस्तीने तक्रारदारांच्या एटीएम कार्डमधून पैसे काढून घेतले होते.
ऐरोली येथील पटणी कंपनीसमोरील मार्गावर तसेच दिवा नाका येथे 6 मे रोजी हा प्रकार घडला होता. यासंबंधी तक्रार प्राप्त होताच चौकशीअंती त्या पाचही पोलीस कर्मचारयांवर परिमंडळ उपआयुक्तांनी मंगळवारी निलंबनाची कारवाई केली आहे. सागर ठाकूर, स्वप्नील काशिद,श्रीकांत गोकनुर, नितीन बराडे व वैभव कुर्हाडे अशी त्यांची नावे आहेत. ते रबाळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी असून 6 मे रोजी ते रात्रगस्तीवर होते. त्यांच्याकडू रात्री अडिजच्या सुमारास ऐरोलीतील पटनी कंपनीसमोरील मार्गावर गस्त सुरु असताना त्याठिकाणी कारमध्ये एक महिला व पुरुष आढळून आले होते. त्यांनी दोघांकडे चौकशी केली असता, ते सहकर्मचारी असून घरी चालले असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर ते त्याठिकाणावरुन निघून गेले असता, पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन दिवा नाका येथे त्यांची कार अडवली. त्यावेळी दोघांनाही कारवाईची भिती दाखवून त्यांच्याकडे तिन लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्यांनी सोबत रोख रक्कम नसल्याचे सांगताच त्यांना एटीएम मधून 46 हजार रुपये काढून देण्यास भाग पाडले गेले. तसेच काही रक्कम महिलेच्या बँक खात्यामधून स्वतच्या खात्यात देखिल जमा करुन घेतली. यानंतर त्यांची महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेवून उर्वरित रकमेसाठी त्यांना त्रस दिला जात होता. त्यामुळे दोघा पिडीतांनी रबाळे पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक तसेच परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार संपुर्ण प्रकरणाची चौकशी लावण्यात आली होती. या चौकशीत पाच कर्मचारी दोशी आढळल्याने परिमंडळ एक चे उपआयुक्त सुधाकर पठारे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.