गोव्याच्या ड्रग व्यवसायात नायजेरियन नागरिकांचा सुळसुळाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:11 PM2018-10-16T18:11:20+5:302018-10-16T18:12:43+5:30
अटक केलेल्या 31 विदेशी नागरिकांपैकी 21 जण नायजेरियन; पहिल्या दहा महिन्यात 173 प्रकरणात एकूण 182 संशयितांना अटक
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - गोव्यात पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा ड्रग्सचे व्यवसायिक किनारपट्टी भागात सक्रीय झालेले असून उत्तर गोव्यात नायजेरियन ड्रग पेडलर्सचा सुळसुळाट वाढलेला आहे. आतापर्यंत या वर्षाच्या दहा महिन्यात गोव्यात एकंदर ड्रग्सच्या व्यवसायात असलेल्या 31 विदेशी नागरिकांना अटक केलेली असून त्यापैकी 21 नागरीक नायजेरियाचे आहेत.
अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलीस कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे 1 जानेवारी ते 15 ऑक्टोबर 2018 या कालावधीत गोव्यात एकूण 173 ड्रग विक्रीची प्रकरणं उजेडात आली असून त्यात आतापर्यंत 182 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये 55 गोमंतकीय, 96 बिगर गोमंतकीय भारतीय तर 31 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. आतारपर्यंत केलेल्या कारवाईत गोव्यातील वेगवेगळ्या भागात तब्बल अडीच कोटी रुपयांचा माल पकडलेला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांतच 10 अमली पदार्थाची प्रकरण उजेडात आली असून यातील बहुतेक प्रकरणं कळंगूट, बागा, अंजुणा आणि वागातोर या पट्टय़ात असून या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एका नायजेरियनासह दोन विदेशी नागरिकांचा समावेश असून दोन हिमाचलच्या नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय तामिळताडू, गुजरात, कर्नाटक यासह तीन गोमंतकीय तरुणांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, यंदा सर्वात मोठय़ा प्रमाणावर अटक झालेल्यामध्ये नायजेरियन नागरिकांचा अधिक समावेश असून 16 मे रोजी अंजुणा येथे केलेल्या कारवाईत इङोक कालेची या नायजेरियनाकडून एलएसडी, अॅक्टसी व केटोमाईनचा 7.30 लाखांचा अमली पदार्थ सापडला होता.10 जुलै रोजी बागा येथे जॉय एङोमिनो या नायजेरियन नागरिकास अटक केली असता त्याच्याकडे पाच लाखांचा चरस आढळून आला होता. 30 एप्रिलला मोरजी येथे फैज सय्यद या आणखी एका नायजेरियनला अटक केली असता त्याच्याकडे 6.40 लाखाचा गांजा सापडला होता.
मिळालेल्या माहितीप्रमाणे गोव्यातील ड्रग व्यवसायात फ्रेंच व रशियन नागरिकांचाही समावेश असून 16 जानेवारी रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाने अंजुणा येथे स्टिफन जॅकीस या 50 वर्षीय फ्रेंच नागरिकाला अटक केली असता त्याच्याकडे 18 लाखांचे कॉकटेल ड्रग्स सापडले होते. यातील विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही कारवाई होण्यापूर्वी मागची 17 वर्षे या इसमाचे गोव्यातच वास्तव होते. 21 जुलै रोजी शिवोली येथे मॅक्सीम मॉस्कोचेव्ह आणि ऑस्टीन सेर्जीओ या दोन रशियनांना गुन्हे शाखेने अटक केली असता त्यांच्याकडे 30 किलो गांजा सापडला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत दहा लाख असून शिवोलीतच या गांजाची लागवड केली जात होती हेही उघडकीस आले आहे.
गोव्यात हा अमली पदार्थाचा व्यवसाय एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर फोफावलेला आहे की त्यात आता स्थानिकही मोठय़ा प्रमाणावर सामील झालेले आहेत.1 फेब्रुवारी रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाने कुठ्ठाळी येथे मध्यरात्री केलेल्या कारवाईत तिळामळ-केपे येथील व्हॅली डिकॉस्ता या स्थानिक युवकाला अटक केली असता त्याच्याकडे 4.85 लाखाचे अमली पदार्थ सापडले होते. 16 फेब्रुवारी रोजी अंजुणा येथे टाकलेल्या धाडीत मिनीन फर्नाडिस या स्थानिकाकडे साडेसात लाखाचे कोकेन तर त्याच दिवशी हरमल येथे टाकलेल्या धाडीत अशोककुमार या 23 वर्षीय बिहारी युवकाकडे साडेचार लाखाचा चरस सापडला होता. 3 सप्टेंबर रोजी अंजुणा येथे प्रविण पंडीत या 25 वर्षीय बिहारी युवकाला अटक केली असता त्याच्याकडेही 6.75 लाखांचा गांजा सापडला होता.
गोव्यात पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसात ज्या कारवाया करण्यात आला. त्यात वागातोर येथे लाल दास या हिमाचलच्या युवकाला 4 ऑक्टोबर रोजी अटक केली असता त्याच्याकडे साडेपाच लाखाचा चरस सापडला होता. त्याच दिवशी कळंगूट पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रणव पटेल या 29 वर्षीय गुजराती युवकाकडे 1.30 लाखांचा चरस व कोकेन सापडला होता. 5 ऑक्टोबरला अमली पदार्थ विरोधी पथकाने हरमल येथे मोहन लाल या कुल्लूच्या युवकाला अटक केली असता त्याच्याकडे एलएसडी व चरस असा 5.65 लाखाचा अमली पदार्थ सापडला होता. तर 7 सप्टेंबरला दाबोळी विमानतळावरुन मस्कतला जाणाऱ्या विमानात बोर्डिंग करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या अल फरहान याच्याकडे तब्बल 8 लाखांचा चरस सापडला होता. यंदा विमानतळावर ड्रग्स जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई होती.
पर्रा, अंजुणा नायजेरियन नागरिकांची मुख्य ठिकाणं
गोव्यात ड्रग व्यवसायात असलेले बहुतेक नायजेरियन नागरिकांचे उत्तर गोव्यातील बागा, पर्रा आणि अंजुणा या भागातच जास्त वस्ती असून या तिन्ही ठिकाणी या नागरिकांच्या विशेष वस्त्याही आहेत. यातील बहुतेक नायजेरियन शिकण्याच्या बहाण्याने किंवा फुटबॉलपटू म्हणून गोव्यात आले होते. मात्र मागची कित्येक वर्षे गोव्यात त्यांचे बेकायदेशीर वास्तव्य चालूच आहे. काही वर्षापूर्वी पर्रा भागातील नायजेरियनांनी पर्वरी येथे मोठा राडा केल्याने त्यांच्या या वस्त्यांवर कारवाई सुरु झाली होती त्यानंतर काहीजणांनी मोरजी व हरमल भागात तर काहीजणांनी शिवोली भागात स्थलांतर केले. रंगाने काळे असलेले हे नायजेरियन पटकन ओळखू येत नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून त्यांची तपासणीही कडक होत नाही. त्याचाच फायदा घेऊन त्यांनी आजर्पयत गोव्यात आपले ठाण मांडले आहे अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
गोव्यात येणारे अमली पदार्थ राज्याच्या बाहेरुन येतात असा समज होता. मात्र, या समजाला छेद देणारे दोन घटना यंदाच्या वर्षी झाल्या. 11 जून रोजी पिसुर्ले-सत्तरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका फॅक्टरीवर धाड घातली असता, तिथे जवळपास 308 किलो केटामाईन हा अमली पदार्थ सापडला होता. या कारवाईत तीन विदेशी नागरिकांसह दहा जणांना अटक केली होती. या घटनेमुळे अमली पदार्थाचे उत्पादन गोव्यातच होत असल्याचे उघडकीस आले होते. 21 जुलैला शिवोली येथे अशीच धाड घातली असता गोव्यात वास्तव्य करुन रहाणारे दोन रशियन या भागात गांजाची शेती करत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरुन गोवाही अमली पदार्थाचे उत्पादन करणारे राज्य अशी प्रतिमा तयार झाली होती.