नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सहा वर्षांपूर्वी एका व्यासपीठावर एका तरुणाने कानशिलात लगावली होती. देवाशीष आचार्य असं या तरुणाचं नाव होतं. मात्र आता कानशिलात लगावणाऱ्या देवाशीष आचार्यचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. काही अज्ञात लोकांनी गंभीर अवस्थेत असलेल्या देवाशीषला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देवाशीषच्या कुटुंबाने त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसारस देवाशीष आचार्यला गंभीर स्थितीत मिदनापुरातील तोमलूक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या रेकॉर्डवरून कळले की, देवाशीषला 4 वाजून 10 मिनिटांनी काही अज्ञात लोकांनी रुग्णालयात आणले होते. त्यानंतर काही वेळेत त्याचा मृत्यू झाला. जेव्हा देवाशीषचे कुटुंब रुग्णालयात पोहचले तेव्हा त्यांना मृत्यूबाबत माहीत झाले. त्यांनी देवाशीषची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
देवाशीषला रुग्णालयात नेमकं कोण घेऊन आलं याचा पोलीस शोध घेत आहेत. घरातील मंडळींनी त्याच्या हत्येचा कट रचला गेल्याचं म्हटलं आहे. देवाशीषने 2020 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात देवाशीष 16 जूनला दोन मित्रांसोबत मोटर सायकलने बाहेर गेला होता. यावेळी सोनापेट्या टोल प्लाझाजवळ एका चहाच्या दुकानावर ते थांबले. त्यानंतर तो अचानक निघून गेला. पुढे काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! लेकीचा 4 सेकंदाचा Voice Message ऐकून कुटुंबाला मोठा धक्का; 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
पंजाबमध्ये मन हेलावणारी एक घटना समोर आली आहे. 3 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा सासरीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुक्तसरजवळील गावात ही धक्कादायक घटना घडली. मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप लावला आहे. तरुणीच्या सासरच्या मंडळींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर दुसरीकडे तरुणीचे पोस्टमार्टम करण्यातही दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे संतप्त आई-वडिलांनी आंदोलन केलं आहे. गगनदीप कौर असं तरुणीचं नाव असून तिने चार सेकंदांचा एक व्हॉईस मेसेज केला होता. त्यात तिने तिला सल्फास दिल्याचं म्हटलं आहे.
गगनदीप कौर हिचे नातेवाईक परमजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनदीप कौर हिचं तीन महिन्यांपूर्वी गुरप्रीत सिंग या तरुणाशी लग्न लावून दिलं होतं. लग्नाच्या वेळी परिस्थितीनुसार त्यांना हुंडाही देण्यात आला होता. लग्नाच्या 10 ते 15 दिवसांपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र त्यानंतर सासरची मंडळी हुंड्यासाठी मुलीला त्रास देऊ लागले. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला मारहाण केली व माहेरी सोडून गेले. त्यानंतर पंचायतीत हे प्रकरण गेलं आणि सर्व भांडण सोडवून मुलगी सासरी गेली. मात्र त्यानंतर पुढील 10 दिवसात सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा मारहाण करुन माहेरी सोडलं.