ह्दयद्रावक! रेल्वे ट्रॅकवर सेल्फीचा नाद २ भावांसाठी जीवघेणा ठरला; दिव्यांग भावाचा पाय घसरला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 07:00 PM2021-06-20T19:00:07+5:302021-06-20T19:01:24+5:30
रेल्वे पटरीवर दोघं जण सेल्फी घेत होते. ज्यात एक दिव्यांग होता. समोरून वेगाने येणाऱ्या ट्रेनने या दोघांना धडक दिली
अलीकडे सोशल मीडियाच्या दुनियेत मोबाईलवर फोटो घेण्याचं वेड अनेक तरूणांना लागलं आहे. जीव धोक्यात घालून सेल्फी घेण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. यामुळे अनेक दुर्घटना घडल्याचं ऐकायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशाच्या फिरोजाबाद येथे रसूलपूर परिसरात रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेताना २ चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत.
माहितीनुसार, मृतांमध्ये एका दिव्यांगाचा समावेश होता. सेल्फी घेताना दिव्यांग रेल्वे पटरीवर पडला त्याचवेळी त्याला वाचवण्यासाठी सरसावलेल्या दुसरा भाऊही ट्रेनच्या अपघातात ठार झाला. हे दोघंही सकाळी फिरता फिरता रसूलपूर येथील रेल्वे पटरीजवळ पोहचले होते. दोघं रेल्वे पटरीवर उभं राहून मोबाईलमधून सेल्फी घेत होते. तेव्हा अचानक समोरून वेगाने ट्रेन आली. त्याचवेळी दिव्यांग असलेल्या भावाचा पाय पटरीत अडकला आणि तो तिथेच पडला.
प्रत्यक्षदर्शी धमेंद्र कुमार याने सांगितले की, रेल्वे पटरीवर दोघं जण सेल्फी घेत होते. ज्यात एक दिव्यांग होता. समोरून वेगाने येणाऱ्या ट्रेनने या दोघांना धडक दिली. फिरोजाबादच्या रसूलपूर भागातील ३० फूट रोड नवीगंज येथे राहणारे सलमान आणि वसीम सकाळी बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र फिरता फिरता दोघं रेल्वे पटरीजवळ पोहचले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघं रेल्वे पटरीवर उभं राहून सेल्फी घेत होते. त्यातील पायाने दिव्यांग असलेला सलमान रेल्वे पटरीवरून बाजूला जाताना त्याचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ वसीम तिथे पोहचला असता तोवर खूप उशीर झाला होता.
समोरून वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या धडकेत दोघाही भावांचा मृत्यू झाला. घटनास्थळीच या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना तात्काळ सूचना दिली. तेव्हा सीओ सिटी फिरोजाबाद येथील हरी मोहन यांनी रसूलपूर परिसरात दोन युवकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचं कळवलं. मृतदेह पडलेल्या ठिकाणचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. ज्या ट्रेनने हा अपघात झाला ती हावडाहून दिल्ली येथे जात होती. एकाच कुटुंबातील दोन युवकांचा ट्रेन अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. युवकांच्या मृत्यूची बातमी कळताच जिल्हा रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती. सलमान हा दोन्ही पायांनी दिव्यांग होता असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.