मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर फाईलमधल्या मजकुराशी छेडछाड, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By पूनम अपराज | Published: January 24, 2021 02:38 PM2021-01-24T14:38:58+5:302021-01-24T14:39:30+5:30
Crime News : हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत मजूकरशी छेडछाड करत आदेशच फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला. ही उघडकीस आल्यानंतर मंत्रालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्रालयातील हा धक्कादायक प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, त्यानंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या सही केलेल्या वरच्या भागात लाल पेनाने एक अतिरिक्त मजकूर (शेरा) लिहण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असे म्हटले होते. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
अशोक चव्हाणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड
अशोक चव्हाण यांना फाईलवरील शेऱ्याबद्दल संशय वाटला. मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या अत्यंत छोट्या जागेत हा शेरा कसाबसा लिहला होता. एरवी मुख्यमंत्री सही करताना मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडलेली असते.
त्यामुळे अशोक चव्हाण यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईल्सच्या स्कॅन करून ठेवल्या जातात. त्या कॉपीज तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा लिहला नसल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांनी नाना पवार यांच्या चौकशीसाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे संबंधित फाईलमध्ये कोणीतरी परस्पर फेरफार केल्याचे उघडकीस आले.