- सुरेश डुग्गर
श्रीनगर : काश्मीरचे खाेरे पुन्हा एकदा टार्गेटेड हत्येने हादरले आहे. बांदीपाेरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका तरुण परप्रांतीय मजुराची हत्या केली. माेहम्मद अमरेज असे त्याचे नाव असून ताे केवळ १९ वर्षांचा हाेता. दहशतवाद्यांनी त्याला गुरुवारी मध्यरात्रीनंतर गाेळ्या घालून ठार केले.
अमरेज हा बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील रहिवासी हाेता. त्याच्या भाऊ माेहम्मद तमहीद याने सांगितले, की आम्ही दाेघे भावंडे झाेपलाे हाेताे. गाेळीबाराच्या आवाजाने ताे उठला. त्याने मलाही झाेपेतून उठवून याबाबत सांगितले. मी त्याला याकडे दुर्लक्ष करायला सांगितले.
थाेड्या वेळाने ताे लघुशंकेला गेला. मात्र, परतलाच नाही. मी त्याला शाेधण्यासाठी बाहेर पडलाे. जवळच ताे रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला मला दिसला. मी तातडीने सुरक्षा दलांना संपर्क केला. ते त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तेथे पाेहाेचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
काश्मीरमध्ये गेल्या ४ महिन्यांमध्ये टार्गेटेड हत्येच्या ११ घटना घडल्या आहेत. तर यावर्षी आतापर्यंत अशा घटनांमध्ये १६ जणांना दहशतवाद्यांनी ठार केले आहे. त्यात ४ परप्रांतीय मजुरांचा समावेश आहे. तर गेल्या पाच वर्षांमध्ये २८ परप्रांतीय मजुरांची हत्या झाली असून त्यात २ महाराष्ट्रातील मजुरांचा समावेश आहे.