मुंबई - दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत होती. घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत चोरबाबत दादर पोलिसांनी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वरळी कोळीवाड्यातून शैलेशकुमार श्रीनाथ यादव उर्फ लल्लन (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. टॅक्सी चालक म्हणून काम करणारा लल्लन हा वरळी कोळीवाडा येथे राहतो. ३१ डिसेंबरपर्यंत लल्लनला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लल्लनला ७ घरफोडींच्या गुन्ह्यात अटक केली आहे. ७ पैकी ४ घरफोडी प्रकरणी पोलिसांनी सोनं हस्तगत केलं आहे. तक्रारदार परिहार यांच्या घरातून ८७ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते त्यापैकी पोलिसांनी २७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. तर आगलावे यांनी त्याच्या घरातून ४४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते आणि ते सर्व दागिने पोलिसांनी लल्लनकडे सापडले आहेत. डिसोझा यांच्या घरातून ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. त्यापैकी ३२.५ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तसेच तक्रारदार लांडगे यांच्या घरातील चोरीस गेलेले २ तोळ्याचे सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे.