निलंबनाची टांगती तलवार?, पोलिसांची शोधाशोध; युवराज भदाणे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 07:01 PM2022-02-21T19:01:14+5:302022-02-21T19:02:11+5:30
Fraud case against Yuvraj Bhadane : याप्रकारने एकच खळबळ उडून पोलीस केव्हाही अटक करण्याची शक्यता आहे. तसेच भदाणे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार लटकली आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी जन्मतारखेत फेरफार केल्याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकारने एकच खळबळ उडून पोलीस केव्हाही अटक करण्याची शक्यता आहे. तसेच भदाणे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार लटकली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे नेहमी चर्चेत राहिले असून त्यांच्यावर यापूर्वी बडतर्फीची कारवाई झाली होती. बडतर्फीवर भदाणे यांनी न्यायालयात स्थगिती मिळवून महापालिका सेवेत कार्यरत आहेत. असे असतांना अनेक प्रकारात ते नेहमी वादात राहिले असून त्यांच्यावर अनेकदा निलंबनाची कारवाई झाली. दरम्यान समाजसेवक दिलीप मालवणकर यांनी एका वर्षांपूर्वी भदाणे यांच्या पीएचडी पदवीवर आक्षेप घेऊन जन्मदाखल्याच्या चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे करून उपोषण केले होते. पीएचडी बोगस असल्याचे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने पालिकेला कळविल्यावर, महापालिका आयुक्तांनी भदाणे यांच्या नावासमोरील डॉक्टर पद काढून टाकण्याचे आदेश काढले. तसेच जन्मतारखे बाबत एक चौकशी समिती स्थापन केली होती.
क्राइम :नशेचा पदार्थ देऊन मुलीला घेऊन पति-पत्नी पोहोचले मुंबईला, होणार होता सौदा, पण...
महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने जन्मदाखल्यात फेरफार करून महापालिकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला. चौकशी समितीच्या निष्कर्षनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला. महासभेत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर, सोमवारी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अक्युत सासे यांच्या तक्रारीवरून भदाणे यांच्यावर जन्मदाखल्यात फेरफार करून महापालिकेची फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. अशी माहिती महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे व मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. दरम्यान भदाणे हे अटक टाळण्यासाठी वैधकीय रजेवर गेल्याचे समजत असून पोलीस त्यांना केंव्हाही अटक करण्याची शक्यता आहे. तसेच भदाणे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत महापालिका अधिकाऱ्यांनी दिले आहे. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहे.