नाशिक : येथील अंबड औद्योगिक वसाहतीत मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका उद्योजकाला हल्लेखोरांनी तलवारीने भोसकून प्रवेशद्वारावरच ठार केल्याची घटना घडली. गेल्या पंचवीस दिवसांमध्ये नाशकात झालेली खुनाची ही आठवी घटना आहे.
गरवारे पॉइंट जवळील सिमेन्स कंपनीसमोर एका लहान इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीत नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर (५२) आपल्या कारने आले. प्रवेशद्वारावर कारमधून ते उतरले. त्याच वेळी दुचाकीने आलेल्या तिघांनी तलवार व अन्य धारदार हत्याराने त्यांच्यावर हल्ला चढवून सपासप वार केले. धावपळ व आवाज झाल्याने कंपनी कामगार, सुरक्षारक्षक बाहेर धावले असता आहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.
त्वरित कामगारांनी रुग्णवाहिका बोलावून जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथून पुन्हा एका मोठ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोलिसांना एक मोठी गंजलेली तलवार आढळून आली.
हल्ला करणाऱ्या तिघांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखा व आयुक्तालयाचे पथक, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात शोध घेतला जात आहे. मे महिन्यात सहा आणि जूनमध्ये एका आठवड्यातच दोन खून झाल्याने नाशिककर हादरून गेले आहेत.
मंत्र्यांचे नातेवाईक? मृत नंदकुमार आहेर हे राज्य मंत्रिमंडळातील एका सदस्याचे जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. आहेर यांच्या काकांची ही कंपनी असून तेच सर्व व्यावसायिक कामकाज बघत होते. पोलीस अधिक बारकाईने तपास करीत आहेत.