‘तू माझी मालमत्ता आहेस..."; IIT च्या विद्यार्थ्यावरील अत्याचाराची कहाणी
By मनीषा म्हात्रे | Published: February 19, 2023 06:47 AM2023-02-19T06:47:43+5:302023-02-19T06:48:00+5:30
समलैंगिक ॲपवरून आयआयटीच्या विद्यार्थ्याची शुभो बॅनर्जीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले अन् त्याने अवघ्या काही दिवसांतच त्याला अंगावर चटके देत, तांत्रिक सेक्स करीत लैंगिक गुलाम बनविल्याच्या समोर आलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. आजही असे अनेक जण ‘लैंगिक गुलामी’ला तोंड देत आहेत. काही प्रकरणे समोर येत आहेत, तर काही जण बदनामीच्या भीतीने आजही चार भिंतींच्या आड अत्याचार सहन करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यातून निघताना स्वप्नांची शिदोरी सोबत घेत तिशीतील तरुणाने मुंबई गाठली. देशातील प्रतिष्ठित मुंबई आयआयटीमध्ये पीएच.डी.चे शिक्षण सुरू झाले. मिळणाऱ्या स्कॉलरशिपमधून उदरनिर्वाह सुरू असतानाच, समलैंगिक ॲपवरून एका नामांकित कंपनीत प्रमुखपदावर असलेल्या ४९ वर्षीय शुभो बॅनर्जीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. शुभो याने तो उद्योजक असून बडे अधिकारी त्याचे मित्र असल्याचे सांगत तरुणाशी जवळीक वाढविली. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. कळत-नकळत तरुणही त्याच्या प्रेमात पडला. घर, हॉस्टेलच्या रूमवर भेटीगाठी वाढल्या. मात्र, काही दिवसांतच प्रेमाचे अघोरी प्रकार सुरू झाल्याने तरुणाला धक्का बसला.
ग्रुप सेक्स पार्टीमध्ये बाेलवायचा
‘रात्री-अपरात्री झोपेतून उठवून जप, मंत्र, तंत्र करीत, अंगावर मेणबत्तीचे चटके देत बॅनर्जी तांत्रिक सेक्स करत असे. विरोध करताच अत्याचार वाढला. मारहाण झाली. एक दिवस उशीने तोंड दाबून हत्येचा प्रयत्न केला. वेळोवेळी तो मित्रांनी आयोजित केलेल्या ग्रुप सेक्स पार्टीमध्ये बोलावत होता. पहाटेच्या सुमारास मंत्रजप करीत त्याने मित्रांना घरी बोलावून अनैसर्गिक अत्याचार केले. मित्रांसाठी ड्रग्ज आणण्यासाठीही दबाव टाकला.
बाल्कनीत जबरदस्तीने अत्याचार करीत असताना सुरक्षारक्षकानेही हटकले. सोशल मीडियावर वेगवेगळे अकाउंट उघडून त्याद्वारे बदनामी करत, ‘तू माझी मालमत्ता आहेस,’ म्हणत लैंगिक गुलाम केल्याचे पीडित विद्यार्थ्याने म्हटले आहे. हिमतीने पोलिसांत धाव घेतली; मात्र त्यांनीही सुरुवातीला प्रकरण हसण्यावारी नेत दुर्लक्ष केले. एकाने तर थेट दम भरून ‘पुन्हा दिसलास तर बघून घेण्या’ची धमकी दिली. वरिष्ठांपर्यंत प्रकरण पोहोचताच तीन महिन्यांनी गुन्हा दाखल करीत बॅनर्जीला अटक केल्याचेही पीडित तरुणाने सांगितले आहे.
१०,५०२ सन २०२१ मध्ये राज्यात अपहरणाचे गुन्हे दाखल.
५०२ तरुणी मानवी तस्करीच्या शिकार.
४१८ तरुणींचे लग्नासाठी अपहरण.
८३ तरुणींचे वेश्या व्यवसायासाठी अपहरण. त्या लैंगिक छळाच्या शिकार.